तारकर्ली गावातील बालसंस्कारांची सलग तिसर्या वर्षी सामाजिक दायित्वाची प्रचिती ..
मालवण | वैभव माणगांवकर : विशेष वृत्त : देशामध्ये कोरानाची तिसरी लाट, भविष्याच्या चिंता,समाजातील ज्येष्ठ नागरीकांची काही ठिकाणी होत असलेलीआबाळ वगैरे चर्चांना सगळीकडे उधाण आलेले असताना तारकर्ली गावातील बाळ गोपाळांनी मात्र समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला .
तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगावकर , कु. यज्ञेश वंदन केरकर , कु.वेदांत सदाशिव सागवेकर , कु. ईशान सदाशीव सागवेकर ,कु . प्रणित भार्गव कांदळगावकर , कु. निनाद गणपत मोंडकर , कु. ॠषभ श्रीधर खराडे , कु.हार्दिक सतिश टिकम , कु. सिद्धेश नरेश टिकम व कु. नैतिक धोंडी कांदळगावकर , कु . रोहित बाळकृष्ण वरक आणि कु . देवेश पराडकर या बाळगोपाळांनी गणेशोत्सवा दरम्यान आपल्या बालभजन मंडळा मार्फत गणेश भजन करून त्यातुन गोळा झालेल्या निधी मधील काही भाग तारकर्ली गावातील श्रीमती मीना महादेव बटाव या गरजु महिलेस मदत म्हणुन दिला . त्यामुळे कोरोना काळात या महिलेचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे .
यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी रवि टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत तसेच गावातील निराधार आणि गरजु महिलांना आर्थिक मदत केली होती व यासाठी त्यांना कामानिमित्त सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या श्री . प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते .हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.
या उदाहरणांवरून तारकर्ली पंचक्रोशीतील सामाजिक दायतित्वाच्या बालसंस्कारांची प्रचिती येत असल्याची भावना तारकर्ली, देवबाग आणि मालवणवासियांतून व्यक्त होत आहे.