मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रदीप हळदवनेकर यांचे विशेष मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात कृषी व फलोत्पादन विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संचलित मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रदीप हळदवनेकर यांनी विद्यार्थी वर्गाला कृषी क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल संबोधीत केले.
पूर्वी शेती ही कनिष्ठ समजली जायची मात्र आता शेतीचे उज्वल व उच्च महत्व ही संकल्पना रुजत आहे. भारतात शेतीची ताकद मोठी आहे. शेती शिवाय पर्याय नाही. कृषी विषयात पदवी घेऊन पुढे केवळ शेती करणे असे नसून त्यातून उपलब्ध असणाऱ्या विविध उद्योग संधी शोधल्या पाहिजे. कृषी, फलोत्पादन या क्षेत्रात करियर व उद्योगाच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनियरिंग व मेडिकलकडे न वळता कृषी व फलोत्पादन क्षेत्रांत करियर घडवावे असे प्रतिपादन कुडाळ मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता श्री. प्रदीप हळदवनेकर यांनी येथे बोलताना केले.
यावेळी श्री. हळदवनेकर यांचा भंडारी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक वामन खोत प्रा गणेश सावंत, प्रा. जितेंद्र गावडे, प्रा.वैभवी वाककर उपस्थित होते.
यावेळी श्री. हळदवनेकर पुढे म्हणाले की आज कृषिचाच एक भाग असणाऱ्या फलोत्पादन म्हणजेच हॉर्टीकल्चर मध्ये सुद्धा करियरच्या अनेक संधी आहेत. भारत देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असून १४० कोटी जनतेला अन्नधान्य, फळ फळावळ पुरविण्याचे काम शेती व फलोत्पादनातून होत आहे. आज कोकणात आंबा, काजू या व्यतिरिक्त देखील अनेक फळांची झाडे उपल्बध आहेत मात्र शेती विषयक अभ्यास नसल्याने आपण मागे पडत आहोत. आज जिल्ह्यात बाहेरचे लोक येऊन शेती करत आहेत. त्यामुळे येथील मुलांनी शेती व फलोत्पादन अभ्यासक्रमकडे वळावे. फलोत्पादनामध्ये सिव्हिल सर्व्हिस, ऍग्रीकल्चर सर्व्हिस, बियाणे निर्मिती, खत निर्मिती, कीटकनाशके निर्मिती, गार्डनिंग, बँकिंग आदी करिअर व उद्योजकीय संधी उपलब्ध आहेत, या क्षेत्रात कौशल्याला मोठे महत्व आहे, असेही श्री. हळदवनेकर म्हणाले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी श्री. सावंत यांनी मान्यवर व उपस्थित सर्वांचे आभार मानले.