कलादिग्दर्शक सुमित पाटील यांचा नेत्रहीनांसाठी समाजोपयोगी प्रयोग….!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विशेष वृत्त : अंध व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्ठी साठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. अंध बांधवांची नेमकी हीच गोष्ट काहीशी सोपी करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध मुंबईकर कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी केला आहे. दृष्टिहीन, नेत्रहीन व्यक्तींना गोळ्या औषधे कळण्यासाठी नेहमी इतरांवरच अवलंबून रहावं लागतं, म्हणून प्रत्येक औषधांसाठी ब्रेल लिपीत मराठी आणि इंग्रजी भाषेतून त्या संदर्भात सर्व तपशील असलेली पाकिटे त्यांनी बनविली आहेत.
या निर्मितीत सुमित याना अरविंद पुरंदरे आजोबांची मोलाची मदत झाली. ही औषधांची पाकिटे टाकाऊ प्लास्टिक पासून तयार करण्यात आली असल्याची माहिती सुमित यांनी दिली आहे.या ब्रेल पाकिटांमुळे नेत्रहीन आणि दृष्टिहीन लोकांना औषधे ओळखता येतील आणि आरोग्याचे अपघात टळून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सुरक्षित वाटेल.
या पद्धतीचा प्रथम युरोप मध्ये प्रयोग झाला होता.
युरोप, दुबई मध्ये ब्रेल मधील कागदी पाकीटं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो अयशस्वी ठरला. कारण कागदावरील ब्रेलमधील अक्षरं पुसट होऊन दिसेनाशी होत होती. गेल्या अनेक दिवसांपासुन केलेल्या या कामामुळे नक्कीच जगात हा प्रयोग होईल आणि दिव्यागांना त्याचा नक्की उपयोग होईल असा विश्वास सुमित पाटील यांनी व्यक्त केला आहे.सुमित यांनी बनविलेल्या पाकिटांवर औषधांच्या नावापासून त्यांचे उपयोग, निर्मिती तारीख असा तपशील आहे.
अनेक औषध कंपन्यांनीही या पद्धतीला सकारात्मकता दाखवणे आवश्यक आहे.
गेल्या दीड वर्षा पासून सुमित हे प्रयोग करून पॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत होते.औषध कंपन्यांनी सुद्धा असा प्रयोग करून पॉकेट बनविण्याची गरज असल्याचे मत सुमित पाटील यांनी व्यक्त केले आहे. सदर पाकिटे बनविल्यानंतर मागील दोन महिने सुमारे ४० नेत्रहीन व्यक्तींना ही पाकिटे हाताळण्यास दिली होती. त्यांच्या पॉझिटिव्ह उत्तरा नंतर ही पाकिटे जगासमोर आणण्यात आली आहेत. अंध व्यक्तींना अनंत कष्टाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांच्या दुःखाचा भार काहीसा हलका करण्याचा प्रयत्न सुमित पाटील यांनी त्यांच्या या वेगळ्या प्रयोगातून केला असल्याचे दिसून येत आहे.