आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक गावातील सुप्रसिद्ध पख़वाज मेकर श्री.सुभाष ऊर्फ बाळू भाट यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेला तीन फूट व्यासाचा नगारा परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा योग साधून त्यांच्या चरणी समर्पित केला आहे. उद्या १९ जानेवारीला गगनगिरी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने गगनगडावर काकड आरतीच्या वेळी या नगाऱ्याच्या नादाने अख्खा गगनगड दुमदुमणार आहे.
बाळू भाट यांनी काही वर्षांपूर्वी अशीच एक उत्तम कलाकृती आपल्या हातून घडवली होती ती म्हणजे दगडाचा तबला..! राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे आणि सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन या सारख्या दिगग्ज कलाकारांनी त्या तबल्याची प्रशंसा केली होती.
त्यांनी सजविलेली अनेक तबला, मृदुंग, पखवाज अशी चर्मवाद्ये केवळ सिंधुदुर्गातच नाहीत तर महाराष्ट्र- गोवा अशा अनेक राज्यातील अनेक भजनी मंडळे, गायक, वादक व संगीत प्रेमी घेऊन जातात.
पख़वाज मेकर सुभाष ऊर्फ बाळू भाट यांच्या हातून अशीच अनेक उत्तमोत्तम नवनवीन वाद्ये घडोत हीच सदिच्छा त्रिंबक व परिसरातील त्यांचे चाहते करत आहेत.