‘लवकर निघा…..सुरक्षित प्रवास करा……सुखरूप पोहोचा’, या प्रवासमंत्राची करुन दिली गेली ओळख.
कणकवली | ब्युरो न्यूज : कोणतेही वाहन चालवताना वाहकांनी स्वतःसोबतच इतरांची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी अपघातास आमंत्रण देते, तरी युवकांनी वाहन चालवताना स्वतःच्या मनावरती व वाहनाच्या वेगावरती नियंत्रण ठेवावे. असे मत डॉ. राजश्री साळुंखे चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली यांनी व्यक्त केले. त्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली आणि पोलीस स्टेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. राजेंद्र कुमार चौगुले, पोलीस उपनिरीक्षक, बापूसाहेब खरात, ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक अशोक करंबेळकर, विनोद चव्हाण हेड कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन कणकवली उपस्थित होते.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खरात म्हणाले की वाहन चालवण्या अगोदर वाहतुकीचे नियम माहिती करून घेणे आवश्यक आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट चार चाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करावा यातून अपघाताची शक्यता कमी होईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक करंबेळकर म्हणाले की, प्रवास करत असताना घरातून लवकर निघा, सुरक्षित प्रवास करा व सुखरूप पोहोचा. वेळ जरी मौल्यवान असला तरी जीव अनमोल आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, वाहन चालवत असताना रस्त्यावरून चालत असणाऱ्या पदचारी लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात ग्रस्त लोकांना कोणतीही भीती मनात न बाळगता मदत करणे आवश्यक आहे. त्याच्यातून अपघातग्रस्त व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी वाहतुकीच्या नियमांची सविस्तर माहिती दिली तसेच अपघात प्रसंगी नागरिकांनी काय करावे याबद्दलही मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. विनया रासम, प्रा. अदिती मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी पालव, सानिका राणे, संज्योती परब व श्रेयस कांबळे या स्वयंसेवकांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश पाटील यांनी तर आभार प्रा. सागर गावडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी १०० स्वयंसेवक उपस्थित होते. व शेवटी रस्ता सुरक्षा अभियान बद्दल स्वयंसेवकांना शपथ देण्यात आली.