नाभिक बाधवांसहीत संपूर्ण जिल्हावासियांना केले डिजीटल फ्राॅडपासून सावध..!
विवेक परब | ब्यूरो चीफ : सध्या मोबाईलमुळे सर्वांचे जगणे सुसह्य झाले आहे. परंतु फ्रॉड कॉल आल्याने अचानक आपल्या अकाऊंटमधून पैसे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात जिल्हा नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार नुकतीच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेची ऑनलाईन गुगल मिट संपन्न झाली.
त्यावेळी सभेला मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर म्हणाले, “कोणतीही ऑनलाईन तथा डिजीटल लिंक क्लिक करण्यापूर्वी अतिशय काळजी घ्या. हल्ली कोणाचेही अनोळखी फोन येत आहेत. त्यावर सलून व्यावसायिक यांना टार्गेट केले जात आहे. कुणीतरी कुमार आडनाव असणाऱ्या व्यक्ती आपण आर्मीमध्ये असल्याबद्दल सांगत आहेत. आपले ओळखपत्र, आधार कार्ड आणि लोकेशन पाठवत आहेत. हिंदी भाषेत बोलत केस कापण्यासाठी ३० ते ५० लोक असल्याचे सांगत आहेत. त्यानंतर नाभिक व्यावसायिकाकडे त्यांचे स्कॅनर, आधार कार्ड किंवा पैसे ट्रान्सफर करणार असल्याचे आमिषे दाखवत आहेत. त्यांच्या लोकेशनवर जाऊन माहिती घेतली असता असे कोणीही आलेले नसल्याचे निष्पन्न होत आहे. तरी कोणीही पैसे मिळणार म्हणून भुलून न जाता सावधगिरी बाळगणे ही आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या घटनेत समोरची व्यक्ती आपल्याला फसवत आहे किंवा फसवणार आहे हे नागरिकांच्या अजिबात लक्षात येत नाही. त्यामुळे अशा फ्रॉड कॉलना बळी न पडण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण यांनी केले आहे.
मुंबई सलून असोसिएशनचे संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटनेचे उत्तम संघटनात्मक कार्य सुरु आहे. त्यात सलून असोसिएशनच्या माध्यमातून कोणतीही मदत हवी असल्यास आमची संघटना आपल्या नक्कीच पाठीशी असणार आहे.
त्यावेळी जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर, कणकवली तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत ( बापू ) चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, संतोष टिपूगडे, जितेंद्र अणावकर, प्रवीण चव्हाण, नंदकिशोर चव्हाण, शुभम लाड, गणेश चव्हाण, गौरव चव्हाण, महेश चव्हाण, संजय कुबल, नितेश पिंगुळकर, प्रकाश लाड आणि बहुसंख्य सिंधुदुर्ग नाभिक बांधव उपस्थित होते.