समन्वयक हेमंत मणेरीकर यांचा पत्रकार परिषदेत दावा
बांदा /राकेश परब: भारतात अल्पसंख्यांकांसाठी सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे. मात्र हिंदूना संरक्षण देणारे मंत्रालय अथवा आयोग नाही. अल्पसंख्यांकाना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान दिले जाते. अजूनही इतर काही नवी संकटे देशासमोर आहेत. हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदू राष्ट्र जागृती सभा प्रेरणदायी ठरेल, असा दावा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले, हिंदूंवर होणार्या अन्यायांवर वाचा फोडण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणावर हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाड्ये, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाड्ये मार्गदर्शन करणार आहेत.
ते म्हणाले, हिंदू जनजागृती समितीच्या सभेसाठी सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातही प्रसार सुरु आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, हिंदुत्वनिष्ठ व लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. सभेच्या प्रचारासाठी गुरुवार ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बांदा शहरात वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे शंकर निकम, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, सचिव, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, युवा उद्योजक डाॅ. नितीन मावळंकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवराम देसाई, संदीप नाणोसकर उपस्थित होते.