मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या सिद्धहस्त लेखणीने आणि वाणीने नेहमीच आपलं वेगळेपण अबाधित ठेवणाऱ्या देसाई कुटुंबीयांच्या पत्रकारीतेत मानाचे दोन गौरव जाहीर झाले आहेत. रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांना बी एम गौरव पुरस्कार तर लोकशाहीचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना अटल गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ब्रेकिंग मालवणी परिवाराच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर काम करणार्या तिघांना “बी.एम गौरव” पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यात पत्रकारितेतील द्रोणाचार्य म्हणून मालवण येथील प्रफुल्ल देसाई यांना, तर आरोग्यदूत म्हणून डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व समाजसेवक पुरस्कार देऊन मुनीर बेग यांना गौरविण्यात येणार आहे. ४ जानेवारीला सकाळी जिल्ह्यातील पाच प्रमुख पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. प्रफुल्ल देसाई मागील तीन दशक पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नवोदित पत्रकार नवोदित कलाकार घडवताना प्रफुल्ल देसाई यांचे योगदान सर्वश्रुत आहे.
त्याचप्रमाणे लोकशाहीचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्याबद्दल सावंतवाडी येथे अटल प्रतिष्ठानच्या वतीने अटल गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आलाय.
सातत्याने गेली १९ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या नावे स्थापन झालेल्या अटल प्रतिष्ठान या न्यासाच्यावतीने १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा व्यक्तींना ‘अटल गौरव पुरस्कार २०२३’ जाहीर करण्यात आल्याची माहिती अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी दिली. ८ जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
पत्रकार प्रफुल्ल देसाई आणि पत्रकार ऋषी देसाई यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.