बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा बाजारपेठेतील धान्यव्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या किराणा दुकानास सोमवारी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले . ग्रामस्थांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न करुन विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी रात्री स्वप्नील पावसकर हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करुन घरी गेले.सोमवारी पहाटे ६.३० च्या दरम्यान त्यांच्या दुकानाच्या माडीवर शॉर्टसर्कीट होऊन आग पेटली.काही क्षणातच ही आग वाढत जाऊन सिलिंगला लागली.दुकान बंद असल्याने कोणाला समजले नाही. त्याचवेळी बांदा उभाबाजार येथिल धिरज भिसे हे या मार्गाने श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाताना त्यांना दुकानातून धुर येताना दिसला.त्यांना आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान दाखवत त्यांनी सर्वांना कऴवले.स्वप्नील पावसकर यांना बोलावून दुकान उघडण्यात आले. त्यानंतर स्वप्नील पावसकर, धीरज भीसे,आशुतोष भांगले,अक्षय गावडे, राकेश केसरकर ,साई पावसकर, साय़ली पावसकर तसेच अनेक ग्रामस्थांनी तात्काळ शर्थीचे प्रयत्न करुन पाणी मारुन आग विझवीली.तरीही किराणा सामान ,पैसे,कागदपत्रे फर्निचर,पंखा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.छपराचेही मोठे नुकसान झाले.
तसेच खालील सामानही पाणी पडून जळून गेले. बांदा बाजारपेठेतील दुकाने ही जवळजवळ आहेत. त्यामुळे सुदैवानेच आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी य़ेऊन नुकसानीचा पंचनामा केला. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब,बांदा शहर भाजप अध्यक्ष बाबा काणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाऊ वळंजू,सर्वेश गोवेकर,तेजस येडवे,सुनिल बांदेकर,ज्ञानेश्वर येडवे आदींसह अनेक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले. बांदा बाजारपेठेतील आगीचा धोका लक्षात घेता लवकरच मिनी अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करु असे प्रियांका नाईक,जावेद खतिब व बाबा काणेकर यांनी यावेळी सांगितले.