संतोष साळसकर | सहसंपादक :
देवरुख वरुन तोंडवळी ता. मालवण या ठिकाणी निघालेल्या इनोव्हा गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर कासार्डे येथे भीषण अपघात होऊन चालकासह चार प्रवासी जखमी झाले असून यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात कणकवली तालुक्यातील कासार्डे पेट्रोल नजीक सायंकाळी ५ वाजता झाला.गाडीतील सर्व प्रवासी हे तोंडवळी ता. मालवण येथे विनायक परब यांच्या घरी इनोव्हि एम.एच. ४६ एम.१०३३ या गाडीने निघाले होते.
जखमींमध्ये प्रवासी विनायक परब वय ३०वर्षे रा. तोंडवळी ता. मालवण ,वसंत गूरव वय- ५०,रा. मुंबई, मुळ गाव देवरुख जि. रत्नागिरी,त्यांची पत्नी सौ.साक्षी वसंत गूरव- रा. मुंबई, वय वर्षे- ४०, मुलगी -कु. भुमी वसंत गूरव वय.,१४ वर्षे व चालक असे मिळून ५ प्रवासी प्रवास करीत होते.
सदर इनोव्हा गाडी कासार्डे पेट्रोल पंपानजीक आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या पुर्वेला सुरक्षतेसाठी असलेले जवळपास ८ते ९ रेलिंग तोडत पाच फुट गाडी आनंदनगर रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर पडली.नेहमीच वर्दळ असलेल्या या ठिकाणी सुदैवाने या दरम्यान सर्व्हिस रोडवर कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
तात्काळ ग्रामस्थ रविंद्र पाताडे,गोट्या पाताडे, समीर मुणगेकर,माजी सरपंच संतोष पारकर, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर,श्री. राणे,सागर पाताडे,आबा मेस्त्री, गणेश कोलते,
उपसरपंच-गणेश पाताडे व इतर लोकांनी धाव घेऊन जखमींना गाडी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
तसेच पोलीस दुरक्षेत्र कासार्डेचे पो.हवालदार चंद्रकांत झोरे, महामार्गाचे पोलिस हवालदार ए.बी.सावंत,विजय देसाई,ए.जी. सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी मोकळा केला.
याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.या अपघातातील जखमींना उपचारासाठी कणकवली येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.