तीन दशकांनी एकत्र आले ‘क्लास मेटस् ‘
प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : “एक दिवस चल पुन्हा लहान होऊया…एक दिवस चल पुन्हा शाळेत जाऊया…एक दिवस चल पुन्हा ते बाक आणि आपल्या शालेय गंमती जगुया…एक दिवस का होईना आपण आपल्या शाळेत जाऊया…” या आणि अशा भावनेत व स्मृतींना उजाळा देण्यासाठी जनता विद्यालय तळवडे,सिंधुदुर्गच्या शाळेचे अंगण भरुन गेले.
२५ डिसेंबरला झालेला श्री जनता विद्यालय तळवडे हायस्कूलच्या दहावी १९९१ – ९२ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा’ हे त्याचे औचित्य ठरले.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्ताने व सर्व स्नेही जणांना एकत्र भेटण्याच्या उद्देशाने व शिक्षकांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता भरलेला हा मेळावा म्हणजे नवीन ऊर्जा, नवीन उत्साह निर्माण करणारी शिदोरीच होता.
शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याला ज्यांच्या संस्कारातून आपण वाढलो, घडलो त्या वंदनीय गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात या मान्यवर गुरुजनांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी विद्यालयाचे सध्याचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवर्गही उपस्थित होते.. यावेळी सर्व गुरूजनांप्रती आदर व्यक्त करीत त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या आनंदसोहळ्याला समूहामधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुमारे ३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने मोकळी झाली व पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. यावेळी मुंबई पुणे गोवा इ. शहरात आणि स्थानिक परिसरात आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या ६२ मित्र-मैत्रिणी एकत्र आल्या होत्या.
अल्पोपहारात इडली सांबार व चटणी असा बेत होता. अल्पोपहारासह दुपारचं स्वादिष्ट जेवण, आईस्क्रीम व केक अशा मेजवानीने या मेळाव्यात अधिकच गोडी वाढली. दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, डान्स आणि गप्पागोष्टी यांनी दिवस सार्थकी लागला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत घेतली. शिल्पा पाटकर, पिंट्या सावंत, नाना कावळे, दिपक मसुरकर, मिलन दळवी, प्रज्ञा परब, हेमंत दळवी इ. माजी विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन केले होते. सुत्रसंचालन धनंजय नाईक यांने तर प्रास्ताविक व शेवटी सर्वांचे आभार माजी विद्यार्थी हेमंत दळवी यांनी मानले.