मालवण | संपादकीय : आज अवघ्या मराठी जनांचे आणि मालवणी संस्कृतीच्या अस्मितेचे लाडके श्री.मच्छिंद्र कांबळी यांचा स्मृतीदिन.
भद्रकाली प्राॅडक्शन आणि त्याहीपूर्वी अस्खलित मराठीसोबत अनेक मालवणी कलाकृतींमध्ये सहभाग असलेल्या मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण नाटकातील सूत्रधार ‘तात्या सरपंच’ याच जवळीकीने प्रेक्षक जास्त ओळखतात.
नाट्य व कलासृष्टीमध्ये बाबुजी या टोपणनांवाने ओळखल्या जाणार्या मच्छिंद्र कांबळी यांचा उमेदीचा काळ कलेने ,प्रतिभेने आणि प्रयत्नांनी भरलेला होता. त्याकाळामध्ये त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. कलाकृतींच्या निर्मितीसाठी प्रसंगी स्वतःच्या घरचे दागिने गहाण ठेवावे लागलेल्या मच्छिंद्र कांबळी यांनी स्वतःकडील अस्सल मालवणीपणाचा दागिना कधीच गहाण ठेवला नाही.
तोच मालवणीपणाचा दागिना त्यांना कलासृष्टीतील ध्रुवपद तथा अढळस्थान देऊन गेला हे नक्की.
29 मे 1982 रोजी समस्त महाराष्ट्र राज्यासाठी आणि प्रादेशिक कलाक्षेत्रासाठी मालवणी वाळूच्या चमकदारपणाला आंतरराष्ट्रीय दरवाजे तिच्या स्वतःच्या नावाच्या पाटीसकट खुले झाले अशी मालवणी भाषेच्या व कलेच्या नावाची पाटी आहे ‘भद्रकाली प्राॅक्शन्स..!’
‘भद्रकाली प्राॅडक्शन्स’ म्हणजे 4000 नाट्यकर्मी जीवनांचा संचय,57 विविध नाट्य कलाकृती आणि 17000 च्या पल्याड असलेले नांव ही आकडेवारीची महती तर आहेच परंतु त्याचसोबत मच्छिंद्र कांबळी ऊर्फ बाबुजी अशा मोठ्या मालवणी बेटाचे ते मालवणी भाषेसाठी,कलेसाठी आणि व्यक्ततेसाठी असणारे दीपगृह आहे.
‘वस्त्रहरण’ या जगविख्यात नाटकाच्या जवळपास 600 प्रयोगानंतर नाटकाच्या संचातून,प्रमुख भूमिका करणार्या व त्या नाटकाचे व्यवस्थापक असलेल्या मच्छिंद्र कांबळी यांनाच अचानक त्याच नाटकातून बाजुला करण्यात आले होते. असे झाल्यानंतर मच्छिंद्र कांबळी यांना अभिनेते मोहन गोखले यांनी स्वतःची निर्मिती असलेली संस्था उभारायची संकल्पना सुचविली होती. प्राॅडक्शन हाऊस उभारणे ही प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक होती . अशावेळी मच्छिंद्र कांबळी यांच्या पत्नीने त्यांचे अंगावरील मौल्यवान दागिने विकून महाराष्ट्र राज्यासाठी आणि मालवणी मनासाठी एक दागिना जडवायला तिचा हातभार लावला…आणि तोच दागिना म्हणजे मच्छिंद्र कांबळी यांचे ‘भद्रकाली प्राॅक्शन्स…!’ नंतर मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्राॅक्शन्स’ ने केलेले वस्त्रहरण हे जगभरात धुमाकूळ घालत अनेक विक्रम नोंदवत जाते आहे ते अगदी आजपर्यंत. ‘चाकरमानी’ नाटक ही भद्रकाली प्राॅक्शन्सची पहिली निर्मिती होती.
‘अफलातून, केला तुका झाला माका,पती माझे छत्रीपती,पप्पा सांगा कोणाचेच,पांडुरंग इलो रे इलो,भारत भाग्यविधाता,मालवणी सौभद्र,मेड फॉर ईचअदर,म्हातारे जमींपर,येवा,कोकण आपलाच आसा,रातराण, रामा तुझी माऊली, वस्त्रहरण, संशयकल्लोळ आणि 18 पुरस्कार विजेते नाटक सुखाशी भांडतो आम्ही ‘,वगैरेंसारखी इतर सगळीच भन्नाट नाटके ही भद्रकाली प्राॅक्शन्सचीच निर्मिती आहे.
मच्छिंद्र कांबळी यांनी अशा 38 नाटकांची स्वतः निर्मिती केली होती आणि त्यातिल जवळपास 25 नाटकांना त्यांच्या अभिनयाचा स्पर्श होता.
कलेच्या क्षेत्रात एकदम उडी मारुन यशस्वी होऊ पहाणार्यांसाठी मच्छिंद्र कांबळींचा संघर्ष पाहणे गरजेचे ठरते. आज अभिनयकलेमधील व वाचिक अभिनयामधील बेसिक्स हे खास असे शिकवायचे वर्ग असतात . बाबुजींनी त्यांचा मालवणीचा वर्ग अगदी मुक्तहस्ते वस्त्रहरण नाटकाद्वारा आजही संपूर्ण जगासाठी खुला ठेवला आहे.
मच्छिंद्र कांबळींच्या स्मृतीदिनी आपले बेसिक्स विसरणार्या प्रत्येक कलाकाराला त्यांचाच प्रेमळ संवाद ऐकवणे बाबुजींना आवडले असते.
आपल्या भातृभाषा, मायभाषा व देशाच्या अभिमानाचा विसर पडल्यानंतर कधीतरी पुन्हा पहिल्यापासून सुरवात करावी लागते…
तो विसर पडू नये म्हणून प्रत्येकाने नक्कीच स्वतःला जमिनीशी जोडून ठेवले पाहिजे असे बाबुजींचे स्पष्ट मत होते.
मच्छिंद्र कांबळी यांनी 30 सप्टेंबर 2007 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक एक्झीटने दुःखी झालेल्या प्रत्येक मराठी चाहत्याला त्यांच्या वस्त्रहरण नाटकातील उद्घाटनाच्या भाषणाचे त्यांच्या आवाजातले वाक्य नेहमी नविन आरंभ करुन द्यायची ऊर्जा देत असते…
“..देवी भगवतीच्या कृपेमुळे आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्याईमुळे..!”
म्हणजे डबो आवाडलेलो दिसता…….!
संपादकीय (आपली सिंधुनगरी चॅनेल)