मिठबांव सरपंच भाई नरे आणि देवगडचे नगरसेवक नीरज घाडी यांनी घेतले बाप्पांचे अद्भुत दर्शन…!
मुणगे | विवेक परब : विशेष वृत्त : ” दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी कसा..अष्टविनायका तुझा महिमा असा…”, ह्या भक्तीगीताच्या ओळी श्री गणपत्तीबाप्पांची विविध स्थानांची प्रचिती देतात. श्री गणेशांचे विविध ठिकाणचे स्थानमहात्म्य अनेक ठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितींचीच समाजजाण देत असते.
अशीच काहीशी अनामिक प्रचिती घेऊन व भक्तीतल्या भावाला जाणून मिठबांवचे सरपंच भाई नरे आणि देवगड नगरपंचायतचे नगरसेवक नीरज घाडी यांनी बाप्पांचे एक अद्भुत दर्शन घेतले.
मुणगे सडेवाडी येथील एकवीस दिवस बाप्पांची सेवा करणार्या कातकरी कुटुंबाला दोघांनी भेट देत कातकर्यांच्या घरी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले. या कुटुंबाला दोन प्रतिथयश व व्यस्त लोकप्रतिनिधींची भेट दिल्यामुळे तेथील कुटुंबियांचा आनंद तर सर्वोच्च होताच शिवाय तिथल्या चिमुकल्या लेकरांनाही त्याचं मोठं अप्रूप व समाधान झालं.
बाप्पा विघ्नहर्ता असतात. जात,पात,पंथ,आर्थिक स्थिती,सामाजिक असामनता,भेदाभेद हे समाजातील सर्वात मोठे विघ्न असतात.
सरपंच भाई नरे व नगरसेवक नीरज घाडी यांनी बाप्पाच्या विघ्नहर्तेपणाची एक प्रचितीच समाजासमोर आणली आहे.
कोरोनाकाळ व लाॅकडाऊनमुळे गणेशभक्तांना अष्टविनायक दर्शन किंवा इतर देवदर्शन सहज शक्य होत नाही आहे. पण भक्तीभावाने दर्शनाचा लाभ कसा घेता येतो ते सरपंच भाई नरे आणि नगरसेवक नीरज घाडी यांनी सहजपणाने जाणवून व दाखवून दिले आहे.