श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान ,पळसंब ‘देव डाळपस्वारी २०२२ ‘ साठी ग्रामस्थ , चाकरमानी आणि मुंबईस्थित पळसंबवासियांची जय्यत भक्तीमय तयारी.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान, पळसंब ‘देव डाळपस्वारी २०२२’ ही ग्रामदेवतांची पर्वणी उद्या १६ डिसेंबरसपासून सुरु होत आहे.
मालवण तालुक्यातील पळसंब गावाची ग्रामदेवता आणि माहेरवाशिणींची माऊली श्री देवी जयंती व श्री देव रवळनाथाचा वार्षिक डाळपस्वारी कार्यक्रम १६,१७ व १८ डिसेंबर २०२२ पासून ग्रामस्थ, मुंबईस्थित पळसंबवासी व पोटासाठी इतर ठिकाणी कार्यरत असलेले मूळ पळसंब गांवचे चाकरमानी भाविक यांच्या भक्तीमय उत्साहात ही पर्वणी संपन्न होत आहे.
गांवची पारंपरिक सामाजिक एकात्मता,भेदभाव विरहीत भक्तीच्या लहरी आणि ग्रामदैवतांच्या कृपेचे कृतज्ञतेचे सुस्मरण , या आणि अशा विविध घटकांसाठी श्री देव डाळपस्वारीच्या पर्वणीची महती आहे.यावेळी पळसंब गांवच्या चारही सीमा , सर्व दैवत स्थळांची आणि मानकऱ्यांच्या घरी देवांच्या भेटीचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला चाकरमानी, पाहुणे व माहेरवाशिणी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. . श्री देवी जयंती रवळनाथ आणि सर्व दैवतांची सेवा, गांवचे मानकरी आणि ग्रामस्थ यथाशक्ती करत असतात. श्री देव रवळनाथ जयंती यांच्या कौल प्रसादाने या डाळपस्वारीचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम म्हणजे पळसंब गावासाठी भक्ती आणि शक्तिची अशी शक्यता देणारी पर्वणी असते . हा वार्षिक भक्तिचा पारंपरिक ठेवा पळसंबच्या भूमी पुत्र व कन्यांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे .
उद्या १६ डिसेंबर पासून सुरु होणार्या या भक्ती सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे असे आग्रहाचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.