सिंधुदुर्ग व रत्नागिरी केंद्रातून ‘निर्वासित’ नाटकाला प्रथम पारितोषिक.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण या संस्थेच्या ‘बझ़र’ या नाटकाला द्वितीय तर स्वराध्या फाऊंडेशन मालवणच्या ‘श्याम तुझी आवस इली रे..’ ला तृतीय पारितोषिक.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण आणि स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह या दोन कला केंद्रांवर १५ नोव्हेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या ‘निर्वासित’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण या संस्थेच्या ‘बझर’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक आणि स्वराध्या फाऊंडेशन, मालवण या संस्थेच्या ‘श्याम तुझी आवस इली रे’
या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकालात दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक स्वप्नील जाधव (नाटक- निर्वासित), द्वितीय पारितोषिक अभय कदम (नाटक- बझर), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- निर्वासित), द्वितीय पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-बझर), नेपथ्य प्रथम पारितोषिक अभय वालावलकर (नाटक- बत्ताशी), द्वितीय पारितोषिक सचिन गांवकर (नाटक- निर्वासित), रंगभूषा प्रथम पारितोषिक सावाजी पराडकर ( नाटक-संकासुरा ते महावीरा), द्वितीय पारितोषिक आदिती दळवी (नाटक- बत्ताशी. १९४७) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रफुल्ल धाग (नाटक- निर्वासित) व शुभदा टिकम (नाटक-बझर), अभिनवासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राजक्ता वाडये (नाटक-भिंती), योगिता सावंत (नाटक-श्याम तुझी आवस ईली रे), किर्ती चव्हाण (नाटक-या व्याकुळ संध्या समयी), भाग्यश्री पाणे (नाटक- ए.. आपण चहा घ्यायचा का ?), सीमा मराठे (नाटक-ऋणानुबंध), योगेश जळवी (नाटक- मधुमाया), प्रसाद करंगुटकर (नाटक- खरं सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (नाटक- पासर-पॉन), कृष्णकांत साळवी (नाटक- मावळतीचा इंद्रधनु) दीपक माणगांवकर (नाटक- मडवॉक)
या भव्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सतिश शेंडे, श्रीमती मानसी राणे आणि श्री. ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
मालवणच्या दोन संस्थांना या स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल मालवण शहर व नाट्य रसिकांकडून ‘बझ़र’ आणि ‘श्याम तुझी आवस इली रे…’ या दोन्ही नाटकाच्या संचांची प्रशंसा आणि अभिनंदन होत आहे.