मालवण | सुयोग पंडित : मूळ मुंबईचा क्रिकेट पटू आणि सध्या गोवा रणजी संघाचा हिस्सा बनलेल्या अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणात शतक झळकावले.
गोव्यात सुरु असलेल्या राजस्थान विरुद्धच्या याच रणजी सामन्यात अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे.
७ व्या क्रमांकावर अर्जुन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने २ षटकार आणि १२ चौकारांच्या सहाय्याने शतक झळकावले.
या शतकासोबतच अर्जुन तेंडुलकरने त्याच्या वडिलांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकर यांनी डिसेंबर १९८८ मध्ये रणजी पदार्पणात शतक झळकावले होते.
अर्जुन तेंडुलकर मागच्या मोसमात मुंबई रणजी संघाच्या चमूत होता परंतु तिथे त्याच्या अष्टपैलूत्वाच्या स्थानासाठी प्रचंड स्पर्धा होती. त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नव्हती . त्यानंतर त्याने गोवा रणजी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
अर्जुन खेळपट्टीवर आला तेंव्हा गोव्याची अवस्था बिकट होती त्यामुळे त्याचे हे पहिले प्रथम श्रेणी शतक खूप विशेष आहे.
अर्जुनचे काका अजित तेंडुलकर यांनी नऊ वर्षांपूर्वी समालोचक हर्षा भोगले यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुनच्या फलंदाजीच्या जन्मजात प्रतिभेची माहिती देताना सांगितले होते की अर्जुनकडे सचिन तेंडुलकर यांच्या पेक्षाही प्रभावी अशी फलंदाजीची जाण आहे फक्त त्याला सचिन यांच्यासारखी संयमी व थंड डोक्याने क्रिकेटला पहायची शिकवण आवश्यक आहे.
मध्यंतरी अर्जुन तेंडुलकर याच्या मुंबई रणजी संघ , मुंबई इंडिअन्स आय पि एल संघ यांतील निवडीबद्दल क्रिकेट क्षेत्रातून अनेकांनी टीकादेखील केली होती . अखेरीस आज गोवा रणजी संघाकडून खेळताना पदार्पणातच शतक झळकावून त्याने तो टीकेचा चक्रव्यूह पार केला आहे असे म्हणता येईल.