श्रावण | गणेश चव्हाण (विशेष वृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड होळीवाडी येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी कु. रेश्मा मंगेश घाडीगांवकर हिला मानेच्या मणक्यांचा त्रास झाल्याने, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाने, शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येणार असे सांगितले. परंतु या गरीब कुटुंबाकडे एवढी रक्कम नसल्याने, गोठणे येथील, सामाजिक कार्यकर्ते व राणे कुटुंबाचे निकटवर्तीय अमरेश प्रकाश रामाणे यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबाकडे धाव घेतली. या खर्चाची जबाबदारी देवगड कणकवलीचे आमदार नितेश नारायणराव राणे यांनी घेतली. आज कु. रेश्मा घाडीगांवकर हिच्यावरील पूर्णपणे उपचार झाले आहेत. याबद्दल रेश्माच्या कुटुंबीयांनी राणे कुटुंबाबद्दल व आमदार नितेश राणे यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दहा बारा दिवसांपुर्वी रेश्माच्या उपचारांसाठी ४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे, हिंदुजा रुग्णालयाने, रेश्माच्या वडीलांना सांगितले. ही रक्कम फार मोठी असल्याने, रेश्माच्या नातेवाईकांनी बर्याच उद्योजक व राजकारणी लोकांकडे, या गरीब रेश्माला सहकार्य करण्याची विनंती केली. कोणीही सहकार्य करायला तयार नसल्याने रामगड गोठणे येथील समाजसेवक प्रकाश शंकर रामाणे व अमरेश प्रकाश रामाणे यांनी पुढाकार घेतला. खासदार नारायण राणे व कुटुंब या मदतीसाठी धावतील या प्रामाणिक उद्देशाने अमरेश रामाणे यांनी सदर आजारपण व येणारा खर्च आम. नितेशजी राणे यांच्या कानावर घातले. लगेचच घाडीगांवकर कुटुंबातील व्यक्तीला आम. नितेशजी राणे यांनी बोलावून घेतले. व २४ तासांत त्या आजारी रेश्मावर हिंदुजा रुग्णालयात उपचार चालु केले.
राणे कुटुंबाच्या या सहकार्यामुळे रेश्माचे काका शामसुंदर घाडीगांवकर व रामगड सरपंच पदाचे, भाजप प्रणित उमेदवार राजेंद्र (बुवा) घाडीगांवकर यांनी प्रकाश रामाणे यांचे बरोबर, कणकवली येथे ॐ गणेश निवासस्थानी आम. नितेश राणे यांची भेट घेऊन, आभार मानले. यावेळी तेजस घाडीगांवकर, तुषार घाडीगांवकर, श्रेयस घाडीगांवकर उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी रेश्माच्या जीवाला व जीवनाला जपून माणुसकीची एक ‘रेशीम गाठ’ जपली असल्याने त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.