मालवण तहसीलदारांना दिले निवेदन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायतीमध्ये गोळवण, कुमामे, डिकवल अशा तीन महसुली गावांचा सामावेश असून या तीन गावांचे गोळवण येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय आहे. गेले वर्षभर हे कार्यालय तलाठ्याविना बंद आहे. गोळवण तलाठी पदाचा कार्यभार कट्टा तलाठ्यांकडे असून विविध दाखले व कामांसाठी कट्टा येथे जाणे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक महसुली कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांच्यातून संताप व्यक्त होत असून गोळवण साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करावा अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन छेडले जाईल असा इशारा गोळवण- कुमामे -डिकवल ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष लाड यांनी मालवण तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
गोळवण तलाठी सजाची जबाबदारी कट्टा येथील तलाठी यांच्याकडे दिलेली आहे. गोळवण- डिकवल हे अंतर सुमारे १० कि. मी. पेक्षा जास्त असून गोळवण- कुमामे-डिकवल हे तीनही गाव डोंगराळ आहेत. त्यामुळे सातबारा व अन्य दाखल्यांच्या कामासाठी कट्टा येथे जाणे फार त्रासाचे होत आहे. गोरगरीब पेन्शनधारकांचे उत्पनाचे दाखले, शाळेतील मुलांच्या उत्पनाचे दाखल्यांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कट्टा येथील तलाठ्यांकडे अन्य गावांचा पदभार असल्यामुळे तेथे गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना तलाठी उपलब्ध होत नाहीत. गावातील असंख्य शेतकऱ्यांची वारस तपास कामे, हक्क सोड कामे गेली २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गावातील शेतकरी मेटाकुटीस आलेला असून त्यांचा राग ग्रामपंचायतीवर काढत आहेत. यातून गावातील ग्रामसभा, मासिक सभा वादळी होऊन ग्रामस्थ सभेमध्ये हगांमा करीत आहेत. तलाठी अभावी शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासूनही वंचित राहावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालेली आहे, असे सुभाष लाड यांनी निवेदनात म्हटले आहे.
गोळवण तलाठी ऑफिस अनेक महिने बंद असल्याने उपलब्ध कागदपत्रांची खराबी झालेली असून याची दखल शासकीय पातळीवर घ्यावी. १५ दिवसात गोळवण साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा, न पेक्षा आठवड्यातून दोन दिवस तलाठी गोळवण सजावर उपस्थित ठेवावे. अन्यथा गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक होऊन कोणत्याही क्षणी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असेही सरपंच सुभाष लाड यांनी निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहे.