मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके गांवचे सुपुत्र रमेश गावडे यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १६५० किमी सायकलिंग प्रवास नुकताच यशस्वी रित्या पूर्ण केला. श्री गावडे हे मुंबईत आयकर विभागात सेवेत आहेत. ब्युटीज ऑन व्हील्स गृपला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. श्री. गावडे हे नेहमी सायकलिंग करत असतात आणि ते इतरांनाही प्रेरणा देत असतात. आता पर्यंत त्यांनी ब-याच सायकलिंग राईड पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये पाचशे किमी पर्यंत अनेक छोट्या मोठ्या तसेच मुंबई ते मालवण अशा राईड पूर्ण केलेल्या आहेत.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर १४ नोव्हेंबरला बाल दिनाच्या रोजी सुरू केली होती. आताची पिढी मोठी होत असताना त्यांना अभ्यास आणि खेळ याची आवड व्हावी तसेच आधुनिक काळात शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सायकलिंगचे महत्व पटवून देण्याचा या सायकल सफरी मागे हेतू असल्याचे गावडे म्हणाले. २६/ ११ च्या मुंबईवर झालेल्या हल्यातील शहीद पोलीस अधिकारी याना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी सदर राइड पूर्ण केली.
या मोहीमेला त्यांना गोवा मुख्य आयकर आयुक्त गोवा श्री. रंजन कुमार, गोवा पोलीस अधिकारी श्री. सुबोध सक्सेना यांनी साथ केली.
प्रवासात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सायकलिंग गृप्सनी त्यांचे स्वागत केले.
कन्याकुमारी येथे पोलिस अधिकारी हजर होते. गावडे यांचे राईड दरम्यान ओरोस येथे मालवण तालुक्यातील ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या होत्या.