दुचाकीच्या डिकीत गोवा बनावटीच्या दारुच्या १२ बाटल्या.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर लावण्यात आलेल्या बॅरिगेट्सला बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक बसली. ही धडक एवढी मोठी होती की यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धोंडू आत्माराम नाईक (रा.आरोस) असे त्या जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
तपासणी नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीस बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. जखमीवर उपचार करून अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले. विशेष म्हणजे दुचाकीची बॅरिगेट्सला धडक बसल्या नंतर गाडीची डिकी उघडली गेली. बांदा पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमी दुचाकीस्वार धोंडू नाईक हे आपल्या ताब्यातील दुचाकी एमएच ०७ एल ९९४१ घेऊन आरोसच्या दिशेने जात होते. दरम्यान बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे आले असता त्यांचा दुचाकी वरील ताबा सुटून त्यांची दुचाकी बॅरिगेट्सला धडकली ही धडक एवढी मोठी होती की त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या गाडिच्या डिकीमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या १२ बाटल्या आढळून आल्या.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास बांदा पोलीस प्रभाकर तेली करीत आहेत.