संतोष साळसकर | ब्युरोचीफ : हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांच्या
पदोन्नतीबाबत शासनाने नवीन अधिसूचना जारी केली. यात आरोग्य सेवकाला पदोन्नती साठी विज्ञान शाखेचा पदवीधर असण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट जाचक आहे. पदोन्नतीसाठी पूर्वी प्रमाणेच दहावी पास ही अट कायम ठेवावी अशी मागणी जिल्हा हिवताप निर्मूलन सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने आज करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन आमदार नितेश राणे यांना देण्यात आले.
आमदार नितेश राणे यांनी याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि शासनस्तरावर पाठपुरावा करून पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ओम गणेश निवासस्थानी आम. नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी पदोन्नतीबाबत बदलेल्या अटीबाबतची माहिती दिली. हिवताप विभागामध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून कर्मचारी सेवेत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विज्ञान शाखेतील पदवीची अट घालण्यात आली आहे. विज्ञान शाखेची पदवी नसलेले आणि जिल्हा हिवताप विभागात काम करणारे जिल्ह्यात तीन हजार कर्मचारी आहेत. या सर्वांना आता विज्ञान शाखेची पदवी घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे पदोन्नतीसाठी २९ सप्टेंबर २०२१ रोजी काढलेला अध्यादेशामध्ये बदल करणे आवश्यक आहे. अध्यादेश जारी झाला त्या पूर्वी हिवताप विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीबाबत सूट देण्यात यावी. याबाबत शासनाने अध्यादेशामध्ये बदल करावा अशीही मागणी हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.
यावेळी आम. नितेश राणे यांनी हिवताप निर्मूलन विभागाच्या राज्य कार्यालयात दूरध्वनी करून या प्रकरणाबाबत माहिती घेतली. त्यानंतर पदोन्नतीबाबतच्या अध्यादेशामध्ये बदल करून हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. तसेचभविष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी माझी गरज भासल्यास अवश्य भेट घ्यावी असे स्पष्ट केले.