संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयातून १९८२ साली १२ वी परिक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ४० वर्षानंतर स्नेह मेळावा पार पडला. यावेळी इतक्या वर्षानंतर पुन्हा आपले शाळेतील मित्र मैत्रिणी भेटणार या कल्पनेनेच अनेकजण उत्साही होते. दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यात विविध जुन्या आठवणी, सध्याच्या आठवणी याबाबत मनसोक्त चर्चा झाली.
खारेपाटणचे उद्योगमहर्शी दिवंगत दादा ढमाले यांचे सुपुत्र संजय देसाई (ढमाले) यानी काॅलेजच्या नुतनीकरण, विस्तारीकरण व पुढील प्रगतीसाठी माजी विद्यार्थी यांचा संपर्क घडवून आणला. आणि तेथुनच याही वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मित्र-मैत्रिणींना एकमेकांच्या संपर्कासाठीचे वेध लागले, शोधाशोध सुरू झाली. भराभर एकाकडून दुस-याचा, दुस-याकडून तिस-याचा, अशा प्रकारे पाठ-पुरावा करीत बहूतेक जण एकमेकांच्या फोन द्वारे संपर्कात आले.
आज काहीजण आपापल्या उद्योग व्यवसायात, तर काहीजण आपल्या नोकरी क्षेत्रात परिपूर्ण अवस्थेत कार्यरत आहेत. काहीजण प्रत्यक्ष भेटून तर काहीजण व्हाट्स-अॅप व फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात सतत राहीले. आणि तेथूनच एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचे वेध व तळमळ निर्माण झाली. एकमेकांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होत होते.
या अप्रत्यक्ष भेटीतून मिळणारा आनंद प्रत्यक्ष भेटीसाठी खुनावू लागला आणि नडगिवे येथे स्नेह भेटीचे ठरले. प्रत्येकाची एकमेकांच्या भेटीची उत्सुकता दुथडी भरून ओसंडून वाहत होती. मुंबई येथून शेखर देसाई (ढमाले),विजय केसरकर, श्रीरंग कानडे, प्रदीप पाटील, सुनिल गिरकर, नंदिनी शेट्ये,प्रमीला शेट्ये, कल्पना तावडे, चिपळूण येथून दिलीप भाबल,पुणे येथून ज्योती जोग, विजय आंबेरकर,कोल्हापूर येथून शैलजा गोखले, रत्नागिरी येथून सुरेखा देवस्थळी,देवाचे गोठणे येथून मुरारी गोठणकर, कशेळी येथून अनंत सावरे, ओणी येथून दिपक लिंगायत, पाली येथून वृंदा लिंगायत, नडगिवे येथून दिलीप मन्यार, खारेपाटण येथून सुनिल पाटणकर, कुणकवण येथून अशोक गांगण, मणचे येथून वासंती देवस्थळी आणि ज्याना ज्याना शक्य होईल अशा सगळ्यांची स्नेह-भेटीची तयारी झाली.
आपण ४० वर्षानंतर एकमेकांना प्रत्यक्ष भेटतो आहोत हा जो आनंद ओसंडून वाहत होता तो अवर्णनीय होता. प्रत्येकाचे डोळे एकमेकांचा चेहरा पाहून ओळख पटवण्यासाठी शोधत होते. त्यानंतर एका दालनात ओळख परेडसाठी जमा झाले. प्रत्येकाने आपली ओळख आणि कौटुंबिक जीवनांबद्दल थोडक्यात ओळख करून दिली. येथेच प्रत्येक जण आपले वय विसरून १८/२० वर्षाच्या १२ वी च्या वर्गात त्यावेळच्या आठवणी आणि १२ वी चा प्रवास याबाबत मनमूराद गप्पामध्ये रमले. त्यानंतर काही वेळाने तेथील आजू-बाजूच्या परिसराला धावत्या भेटी झाल्या.
त्यानंतर थोड्या विश्रांती नंतर सायंकाळी खारेपाटण परिसरातील मित्र-मैत्रिणींच्या घरांना धावती भेट झाली. पुन्हा रिसाॅर्टवर येवून रात्री ६० वर्षांच्या मुला-मुलींची अंताक्षरी रंगली, प्रत्येकजण मनमुराद आनंद लुटत होते. काहीनी मित्रांसाठी भेट वस्तू दिल्या, प्रत्येकाच्या चेह-यावर एकमेकांच्या भेटीचा आनंद खळखळत्या झ-या प्रमाणे ओसंडून वाहत होता. याच वेळी खारेपाटण पंचक्रोशीचे विजय देसाई (ढमाले) यानी या ग्रुप ला सदिच्छा भेट दिली. त्यानीही आम्ही ४० वर्षानंतरही एकमेकांच्या संपर्कात सतत राहीलो म्हणून समाधान व आनंद व्यक्त केला.