किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने झाले ध्वजाच्या प्रतिमेचे मनोभावे पूजा..
कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहीत पवार यांची संकल्पना..
मालवण | वैभव माणगांवकर : कर्जत जामखेड मधील खर्डा जवळच्या शिवपट्टण किल्ल्याच्या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर आरोहण करण्यात येणाऱ्या भारतातील सर्वात उंच अशा ७४ मीटर उंचीच्या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिमेची परिक्रमणा यात्रेचे आज मालवणात शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मालवण बंदर जेटी येथे किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात उपस्थितांनी या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिमेचे पूजन करीत स्वराज्य ध्वज रोवण्यासाठी आवश्यक असणारी मालवण भूमीतील मूठभर माती ध्वज परिक्रमणा यात्रेच्या शिलेदारांनी उराशी घेत पुढे मार्गक्रमणा केली.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी खर्ड्या जवळच्या शिवपट्टण किल्ल्याजवळ भारतातील सर्वात उंच ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर उभारण्याचे ठरविले आहे. तत्पूर्वी स्वराज्य ध्वजाची भारतातील सहा राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये परिक्रमणा करण्यात येत असून या परिक्रमणेत हिंदवी स्वराज्याच्या इतिहासा बरोबरच भारतीय संस्कृती, वारसा यांची करण्या बरोबरच तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ८ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या स्वराज्य ध्वजाच्या या परिक्रमणा यात्रेच्या आजच्या अठराव्या दिवशी स्वराज्य ध्वजाची प्रतिमा मालवणात आली. मालवण बंदर जेटीवर या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी या परिक्रमणा यात्रेचे प्रमुख नाना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, बाबू डायस, शहर अध्यक्ष अगोस्तिन डिसोझा, प.स. सदस्य विनोद आळवे, प्रमोद कांडरकर, संदीप राणे, सूर्यकांत दाभोलकर, जयंत पाटकर, सदफ खटखटे, सलीम खान, युवती तालुकाध्यक्ष नम्रता चव्हाण, कोमल पेडणेकर, नगमा शेख हृषीकेश दर्भाजन, विष्णू यादव, पंकज लोखंडे, रामदास दूतार, संदीप शिंदे आदी व इतर उपस्थित होते.