आमदार वैभव नाईक यांना माजी सभापती उदय परब यांचा उपरोधिक टोला
पाच वर्षांपूर्वी दिलेल्या त्या आश्वासनाची करून दिली आठवण
मसुरे | प्रतिनिधी : नादुरुस्त बनलेल्या रस्त्यांची जबाबदारी माझी सांगणारे आणि सदैव जनते सोबत म्हणणारे आमदार हे मतदारांच्या गाड्या खिळखिळया झाल्यात, मणक्यात गॅप झाल्यात काही अपघात ग्रस्त झालेत त्यांची जबाबदारी घेणार का? असा सवाल मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांना केला आहे. ते पुढे म्हणतात, ज्यांच्या टु व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर गाड्या कामाला आल्या त्या बाबत आमदार नाईक यांनी बोलावे. रस्ते दुरुस्ती ही जनतेच्या पैशातून होणार आहे. आपल्या खिशातून स्वखर्चाने नाही. पाच वर्षापुर्वी कांदळगाव येथील बॉडी बिल्डर स्पर्धा उद्घाटन वेळी उद्या पासुन रस्त्याचे काम सुरू होईल म्हणून रामेश्वराच्या भुमीत आपण खोटे बोललात, पण ही रामेश्वराची भुमी आहे इथे सत्यच टिकणार आणि सत्य हे आहे की गाड्या खिळखिळया व्हायला लोकांच्या मणका, पाठदुखी सारख्या आजारांना सर्वस्वी आपण जबाबदार आहात.
कांदळगाव रस्त्यासाठी चार लाख रुपये मंजूर झाले होते. टेंडर प्रोसिजर होऊन ठेकेदार उदय बागवे यांना काम मिळाले होते परंतु ते ज्या दिवशी प्रत्यक्ष काम करण्यासाठी आले त्यावेळी ग्रामपंचायतीला मेल आला की आपला चार लाख मंजूर असलेला रस्ता हा पावशी कुडाळ येथे फिरवला आहे. हा रस्ता रद्द करून बदल करण्याचे पाप कोणी केले हे ही जनतेला आमदारांनी सांगावे!
मालवण कांदळगाव मसूरे ह्या रस्त्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी स्वतः जाऊन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा केला आहे. त्यापूर्वी या गावचे सुपुत्र जी एस परब हे आपले गटनेते सुनील प्रभू यांच्या बरोबर महिनाभर पाठपुरावा करत होते. आमचे बिचारे ग्रामस्थ अक्षरशः त्रयस्थ होऊन आंदोलन करत होते. त्यांना पंधरा दिवसात डांबरीकरण करुन देतो म्हणून १२ फेब्रुवारी ला आश्वासन दिलेत. यानंतर चार महिन्यात आपण डांबरीकरण केले नाहीत आणि पावसाळ्याचे निमित्त देत आहात. २७ फेब्रुवारी ते २७ मे पर्यंत पंधरा दिवस पुर्ण होत नाहीत का? मग खोटे आश्वासन ग्रामस्थांना देऊन फसवणूक का केली?हा सवाल माझा एकट्याचा नसून प्रत्येक ग्रामस्थांचा आहे त्यामुळे त्या सर्वांच्या नादुरुस्त बनलेल्या गाड्यांची आणि वैधकीय व्यवस्था करावी लागलेल्या ग्रामस्थां विषयीची जबाबदारी घेउन खंत व्यक्त करा आणि जाहीर माफी मागावी असा सल्ला माजी सभापती उदय परब यांनी दिला आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाच वर्षांपूर्वीच्या जाहीर सभेत रस्त्याच्या दिलेल्या आश्वासनाला, १२ फेब्रुवारीला आंदोलन कर्त्यांना दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करणे हे जर आपल्या करिता राजकारण असेल तर ते तुम्हालाच लखलाभ असा उपरोधिक टोला उदय परब यांनी शेवटी लगावला आहे.