ई-पीक पाहणी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचे आवाहन
टाटा ट्रस्ट, एन.आय.सी आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व सोप्या मराठी भाषेतील शेतकऱ्यांसाठी अँप
संतोष साळसकर/शिरगांव : आता ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील शेतात घेतलेल्या पिकांची नोंद आपल्या मोबाईल अँपच्या मदतीने गाव नमुना १२ मध्ये स्वतः नोंद करण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली आहे.यापुढेही प्रत्येक हंगामात ई पीक पाहणी या अँपद्वारेच नोंदणी होणार आहे.’माझी शेती,माझा सातबारा,मीच भरणार पीक पेरा’ हा अभिनव उपक्रम शासन शेतकऱ्यांसाठी राबवत आहे.याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे देवगडचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी शिरगाव येथे बोलताना सांगितले.
देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात महसूल विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका,विद्यार्थी,ग्रामस्थ व शेतकरीवर्ग यांच्यासाठी ई पीक पाहणी प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रांताधिकारी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले,शासनाने सातबारा संगणिकरण प्रक्रिया सुरू केली.त्यामुळे सातबारा आता शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध झाले आहेत.त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे मोबाईल अँपच्या माध्यमातून ई पीक पाहणी असा आहे.
टाटा ट्रस्ट,एन आय.सी.आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व सोप्या मराठी भाषेत शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी हा अँप उपलब्ध करून देण्यात आला आहे.या योजनेत शासनाने शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणते पीक घेतले आहे हे अँपच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव नमुना १२ मध्ये नोंदणी करता येणार आहे. यामध्ये खातेनिहाय गट नंबर/सर्व्हे नंबर किव्हा नावनिहाय गट नंबर/सर्व्हे नंबर शोधता येणार आहे.एकल पीक,मिश्र पिके,बांधावरील झाडांची नोंद, फळबागा,पड क्षेत्राची नोंद शेतकऱ्यांना करता येणार आहे.यापुढील हंगामासाठी ई पीक पहाणीद्वारेच पिकांची नोंद होणार आहे.असे सांगण्यात आले.
यावेळी संदीप साटम म्हणाले,देवगडचे प्रांताधिकारी सुधीर साटम यांनी कमी वयात २८ व्या वर्षी प्रांताधिकारी झाले.त्यांचे शिरगाव हायस्कुलच्या १० वी,१२ वी मुलांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी शिरगाव हायस्कुल मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात यावे अशी विनंती केली असता प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संमती दिली.
यावेळी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी देवगड तहसीलदार मारुती कांबळे,शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम,मानद अधीक्षक रवींद्र जोगल,संस्था पदाधिकारी मिलिंद साटम,संदीप साटम,हेमंत देसाई,मंगेश लोके,सरपंच समीर शिरगावकर,मंडळ अधिकारी दीपक पावसकर,कृषी पर्यवेक्षक अनिल आपटे,तलाठी स्वेतांजली खरात,प्राचार्य शमशुद्दीन अत्तार आदींसह अंगणवाडी सेविका,विद्यार्थी,ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सागर करडे यांनी केले.