चिंदर / विवेक परब :
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने, रानमित्र टुरिझम आचरा तर्फे आयोजित करण्यात आलेला, हिंदळे गावातील पक्षीगणनेचा कार्यक्रम, सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत हिंदळे गावातील सडेवाडी, मोर्वे, रानेवाडी आणि हेदल या परिसरात पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत एकूण 74 प्रजातींच्या 336 पक्षांची नोंद करण्यात आली. पक्षीगणनेचा कार्यक्रम सकाळी 7 ते 10 या वेळेत घेण्यात आला.
व्हिगोरचा शिंजिर, छोटा गोमेट, समुद्री गरुड, टोई पोपट, टिकेलची निळी लिटकुरी, जंगली पिंगळा या स्थानिक प्रजातीसोबतच पांढुरका भोवत्या, कवड्या टिलवा, छोटा कंठेरी चिखल्या, सामान्य तुतारी, सामान्य हिरवा टिलवा आणि सामान्य गप्पीदास यांसारखे स्थलांतरित पक्षीही आढळून आले.
या पक्षीगणनेसाठी रानमित्र टुरिझम आचराचे डॉ. श्रीकृष्ण मगदूम, स्वप्नील गोसावी, संतोष गोसावी, सिद्धेश देवधर आणि तेजस सामंत उपस्थित होते.