जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला
अँड. कौस्तुभ मराठे यांनी फिर्यादी महिलेच्या वतीने काम पाहिले
ऋत्विक धुरी / देवगड : प्रेयसीला लग्नाचे खोटे वचन देत तिच्यावर भावनिक दबाव टाकत कातवण व देवगड किल्ला येथे नेवून बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयी आरोपी रुपेश चंद्रकांत आचरेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर करत फेटाळला आहे. याकामी फिर्यादी महिलेच्या वतीने अॅड कौस्तुभ मराठे व सरकार पक्षाचे वतीने अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले. सन २०१६ सालापासून पिडीत महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला लग्न करण्याचे वचन देवून तिच्या इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवून कालांतराने तिची फसवणूक केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६ (२), ५०४, ५०६ खाली देवगड पोलीस स्टेशन येथे दि. २३ जुलै २०२१ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती. याकामी पिडीत महिलेने पोलीसात केलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीने पिडीत महिलेकडून रक्कम रु. ३०,०००/- उसने घेवून ते परत न देता फसवणूक देखील केली होती. सदर प्रकरणातील संशयित आरोपी रुपेश चंद्रकांत आचरेकर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. संशयिताने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. त्यानंतर आरोपीला देवगड पोलीसांनी अटक केली होती. आरोपीच्या जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.