वैभव माणगावकर / मालवण : कोळंब पुलाच्या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार एवढा निधी खर्च करूनही पुलाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून कामाच्या वेळी ठेकेदाराकडून पुलाच्या खाली कोळंब खाडीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्यापही काढलेला नाही. यामुळे खाडीपात्रातील मासेमारीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे . या भरावामुळे पाण्याचा प्रवाह देखील मंदावल्यामुळे पावसाळ्यात पुरजन्य स्थिती निर्माण होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले असून पुलाखालील मातीचा भराव काढण्यात यावा या मागणीसाठी २२ सप्टेंबर रोजी याच भरावाच्या ठिकाणी खाडीत उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मालवणच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कोळंब खाडीतील मच्छीमारांनी दिला आहे.
मालवण मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी कोळंब पुलाच्या खालील खाडीपात्रातील भरावाची पाहणी करत आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, बबन कोयंडे, प्रथमेश करंगुटकर, महादेव पाटील, प्रथमेश राऊत, प्रमोद खडपकर आदी उपस्थित होते.
यावेळी संदेश कोयंडे म्हणाले, कोळंब पूल धोकादायक बनल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ९५ लाख एवढ्या निधीचे एस्टीमेट तयार करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात किती खर्च झाला याची माहिती नसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला ६ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. पुलाचे काम मात्र नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. पुलाच्या कामावेळी टाकण्यात आलेला मातीचा भराव ठेकेदाराने काढलेला नसताना त्याला बिल कसे अदा करण्यात आले. आम्हाला वरिष्ठ पातळीवरून फोन आल्याने ठेकेदारचे बिल अदा केले असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सांगत आहेत, अशी माहिती संदेश कोयंडे यांनी देत कोण फोनाफोनी करत होते, यामागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? असे प्रश्न उपस्थित केले. कोळंब पुलाच्या कामाची, काढलेल्या बिलाची व बिल काढणाऱ्या अभियंत्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करत लक्ष वेधले आहे. पुलाखाली टाकलेल्या गाळामुळे स्थानिक पारंपारिक मच्छीमारी धोक्यात आली आहे. भरावामुळे खाडीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने पावसात पूरजन्य स्थिती निर्माण होऊन आडारी, देऊळवाडा, रेवतळे आदी भागात पाणी भरत आहे. त्यामुळे हा भराव तात्काळ काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी संदेश कोयंडे यांनी केली.
यावेळी उपस्थित मच्छीमार म्हणाले, कोळंब खाडीत पावसाळा कालावधीत मिळणारे मासे, कालवे, शिंपले यांच्या विक्रीतून आम्ही पावसाळ्यात उदरनिर्वाह करतो. मात्र कोळंब पुलाखाली टाकलेल्या भरावामुळे पाण्याचा प्रवाह मंदावून माशांची संख्याही घटली आहे. खाडीत मिळणारी कालवे, शिंपले हे देखील मिळेनासे झाले असून यामुळे उत्पन्नाचा स्रोतही कमी झाला असून आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. हा भराव तातडीने काढण्यात यावा या मागणीसाठी या भागातील आम्ही सर्व मच्छीमार २२ रोजी पाण्यात उतरून आंदोलन करू, असेही मच्छीमार म्हणाले.