राकेश परब / बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इग्लिश स्कूल मध्ये यावर्षी सुद्धा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर या शिबिरात नावनोंदणी विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ऑक्टोबर महीन्यापासुन अनुभवी प्रशिक्षकाकडून प्रत्यक्ष मैदानी व लेखी अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या कार्यकारिणी पदाधिकारी रश्मी तोरसकर यांनी दिली. यावेळी सरपंच अक्रम खान, संस्थेचे स्वीकृत सदस्य मकरंद तोरसकर, कल्पना तोरसकर, खेमराज प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर, क्रीडा शिक्षक नंदू नाईक आदी उपस्थित होते.
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व भरतीची पूर्वतयारी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून लवकरात लवकर दिलेल्या नंबर वर संपर्क करून नाव नोंदणी करायची आहे. यासाठी क्रीडा शिक्षक नंदू नाईक- ९४०३५५८७१६ या नंबर वर संपर्क करायचा आहे. हे प्रशिक्षण शिबिर २ ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचे श्री तोरसकर यांनी सांगितले.
यावेळी रश्मी तोरसकर म्हणाल्या की, बांदा शहर व दशक्रोशीतील मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे यासाठी गतवर्षी पासून संस्थेने प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. याचा लाभ अनेक मुलांनी घेतला आहे. आपल्या ग्रामीण भागातील मुले शासकीय सेवेत भरती व्हावीत हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सकाळी खेमराज प्रशालेच्या क्रीडांगणावर मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच संस्थेतील अनुभवी इंग्रजी, गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान विषय तज्ञ हे मुलांना लेखी सरावासाठी मार्गदर्शन करणार आहेत.