पळसंब मध्ये आयोजीत झाली एकत्रीत सभा.
‘शाळांना टिकवण्यासाठीची’ अनोखी मोहीम.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पंचक्रोशीतील सरपंचांनी शैक्षणिक क्षेत्रातील एक वेगळा शांततापूर्ण उठाव सुरु केला आहे.
२० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय शासन स्तरावरून प्रयत्न होत असल्याची माहिती गेले काही काळ चर्चिली जात होती. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांनी माध्यमांना तसे सध्यातरी काही होणार नसल्याचे सांगितले होते.
यानंतर आपल्या गावात जिल्हा परीषद शाळा टिकण्यासाठी आचरा पंचक्रोशीतील सरपंचांनी एक वेगळी जागर तथा शांततापूर्ण उठाव मोहीम सुरु केली आहे. यापुढे गावातल्या शाळांना बंद करण्याची अफवा तथा कुणकुणही लागू नये म्हणून या सरपंचांनी ही मोहीम सुरु केली आहे. यात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व माजी सरपंच मंडळींचाही समावेश आहे.
मालवण तालुक्यातील अनेक शाळा बंद झाल्या याचा फटका सर्वसामान्य व गरीब जनतेच्या मुलांना बसणार असल्याने व कोकणातील भोगोलिक परीस्थिती पहाता मुलांची भविष्यातील परवड थांबावी या साठी आचरा पंचक्रोशीतील माजी सरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य लोकप्रतिनिधी यांची पळसंब येथे सभा संपन्न झाली. या सभेत कोणत्याही परिस्थितीत सदर शाळा बंद करू देणार नाही असा पवित्रा उपस्थित सर्वांनी घेतला. यासाठी ग्रामसभेमध्ये आवश्यक ते ठराव घेवून मालवण तालुक्यात जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले .
या सभेला मा. श्री चंद्रकात गोलतकर (सरपंच पळसंब), श्री प्रशांत परब (सरपंच श्रावण ), श्री हेमंत पारकर (सरपंच अजगणी), श्री विलास घाडीगांवकर (सरपंच रामगड ) ,श्री गणपत पाटकर ,श्री आनंद लाड, श्री रविकांत सावंत, श्री निलेश साटम, श्री अमोल साटम, श्रीमती सानवी सडेकर, श्रीमती जयश्री कावले ,श्री जगदीश चव्हाण, श्री मंगेश यादव, श्री शिवराम परब, श्रीमती सविता जंगले उपस्थित होते.
या संदर्भात उपस्थित सर्व सरपंच आपापल्या क्षेत्रातील वरीष्ठ लोकप्रतिनिधी,अधिकारी ,ग्रामस्थ वगैरे सर्वांपर्यंत या मुद्द्याबाबत गावोगावची मुलभूत शैक्षणिक भूमिका म्हणजे जि.प.शाळा टिकविणे असल्याचे प्रतिपादन सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने केले आहे.