विद्यार्थ्यांनी बनवली स्वयंचलित नालेसफाई यंत्राची प्रतिकृती.
शिरगांव | प्रतिनिधी : कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ व १० डिसेंबर २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल फोंडा घाट येथे संपन्न झाले. यंदा या प्रदर्शनाचे ५२ वे वर्ष होते. यामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी या प्राथमिक गटात सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र ३ च्या कु ओम आनंद हळवे व कु. विराज संतोष कुमार कल्याणकर यांनी सादर केलेल्या स्वयंचलित नालासफाई यंत्र या प्रतिकृतीचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला.
त्यांना विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले. आपत्ती व्यवस्थापन या उपविषय अंतर्गत नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर समस्येवर उपाय म्हणून स्वयंचलित नाले सफाई ही प्रतिकृती बनवण्यात आली होती. शाळेच्या यशाबद्दल कणकवली बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ प्रेरणा मांजरेकर, कणकवली केंद्रप्रमुख के एम पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अक्षया राणे, शाळेतील सर्व सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण, उपाध्यक्ष सौ सायली राणे व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कणकवली क्र ३ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाने या यशाबद्दल प्रशंसा केली आहे.