प्रतिनिधी ( मळगांव) | नितिन गावडे : बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग, महिला विकास कक्ष, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी अधिकार दिना निमित्य महिला व त्यांचे मानवाधिकार याविषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चांगला समाज जर निर्माण व्हायचा असेल तर समाजाला अधिकारांची व कर्त्यव्याची जाणीव असणे गरजेची आहे, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराची जाणीव असावी असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री मिलिंद कांबळे, अधिकारी, महिला बालकल्याण विभाग सिंधुदुर्ग यांनी आपल्या भाषणात महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने निर्माण केलेल्या विविध कायद्याविषयी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध कायदे, केंद्र शासन व राज्यशासनाच्या महिला व मुलींसाठी विकासाच्या विविध योजना, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेला कायदा तसेच महिला अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी निर्माण केलेल्या समुपदेशन केंद्र याविषयी मार्गदर्शन केले.
श्री अक्षय कानविंदे यांनी मानवी अधिकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आवश्यक असून त्यातूनच एक जागृत समाज निर्माण होऊन समाज उन्नतीची उद्दिष्ट्ये सफल होऊ शकतात असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मनीषा मुजुमदार यांनी प्रास्ताविकाच्या प्रास्ताविकात, महाविद्यालयात महिला सुरक्षितेसाठी व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विवेक चव्हाण यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पांडुरंग गावडे, डॉ. कमलेश कांबळे, डॉ. जी. पी. धुरी, डॉ. सचिन परुळकर यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रा. लक्ष्मण नैताम, प्रा. जे. वाय. नाईक तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.