बांदा | राकेश परब : दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरूवात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकलेल्या तथा परिपक्व भाताची कापणी लांबणीवर पडली आहे. पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कापणीयोग्य झालेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत पडला आहे.
सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती पिकवली जाते. परंतु सध्याच्या वातावरणातील बदलामुळे व दररोज पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेले भातपीक नुकसानात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्गामध्ये चिंता पसरली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भात कापणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी सध्या लांबलेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, दांडेली, निगुडे तसेच बांदा परिसरात भाताचे परिपक्व पीक पूर्णपणे कापणीयोग्य झाले असल्याने शेतकरी भात कापणीच्या तयारीत आहे. परंतु दररोज सुरू असलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे भाताच्या तयार झालेल्या लोंबी गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
गवारेड्यांचा उपद्रवामुळे मडुरा पंचक्रोशीत शेकडो एकर जमीन पडीक आहे. त्यात अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास केलेला खर्च तरी भरून निघेल का अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. अजून थोडे दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.