कथा.
डीजेवर फिल्मी गाणी वाजवली जात आहेत. बालगोपाळ…अं हं.. ‘किड्स सर्कल’ त्यावर मनाला येईल तसे नाचत आहेत. सगळ्यांनी महागडेसे टाॅप,शर्ट्स स्कर्ट्स असे पार्टीवेअर घातलेले आहेत. डान्स करताना हनी बनीची कंपनी मस्ट.
” एय हनी बनीss कमाॅन अँड डान्स विद अस.” अशी बच्चे लोकांनी आरोळी ठोकली की, आपला अवजड हनी ड्रेस सांभाळत दिवेशला जाडजूड मान हलवत डुगुडुगु पावलं टाकत डान्स करावा लागतो आहे.त्या गलेलठ्ठ हनीला बघून बच्चेमंडळी खिदळायला लागली की,ज्याचा बर्थ डे आहे त्याचे पेरेंटस,
” कितना बढिया हुआ यार,बड्डे में हनीबनी लाया इव्हेंट मॅनेजरने.देखो ना, कितने मजे ले रहे है बच्चे लोग इनके साथ.” असं जमलेल्यांना म्हणत आहेत.
” हां ना दोस्त.मुझे भी नंबर दे दो उनका.हमारे रिंकीका भी बड्डे है आगले हप्ते.बुला लेंगे हम भी.”
दिवेश हे सगळं ऐकतो.चला पुढच्या महिन्यातही काम मिळणार तर.पण आज हा बड्डे लवकर संपायला हवाय.
उद्या अंध विद्यार्थ्याचा रायटर म्हणून परीक्षेला जायचं आहे.लवकर उठावं लागेल.आपण आलो हे नुसत्या आपल्या वासावरून कळतं कल्पेशला.किती खूष होतो.किती गोड हसतो.
पण आता बर्थ डे सेशन संपेल तेव्हा जायला मिळेल घरी.घरी जाऊन परत माईसाठी थोडी खिचडी तरी शिजवावी लागेल.आपलं काय इथे खाणं होईल काहीतरी.
कोरोना होऊन बाबा गेले आणि माईनं अंथरूण धरलंय.आपण काॅलेज सांभाळून असं काहीतरी जोडीला करून चार पैसे मिळवतो. कधी हाॅस्पिटलमध्ये रूग्णाला सोबत कर, कधी अंध विद्यार्थ्याचा रायटर , कधी हे हनी बनी …तासावर बरे पैसे मिळतात. तेवढाच माईच्या औषधपाण्याला हातभार म्हणून..!
खरंतर खूप अभ्यास करावा, पुरातत्व विभागासंबंधी मिळतील ते संदर्भग्रंथ वाचावेत असं कित्ती वाटतं… पण नियतीच गरागरा फिरवते…जेमतेम पास झालं तरी…असो.
आता डान्सला बच्चेकंपनी कंटाळली. डान्सचा नाद सोडून चाॅकलेटस,एनर्जीबार,स्प्राईटस, आईस्क्रीमच्या स्टाॅलकडे पळापळ सुरू झालीय.
हनीच्या ड्रेसमधला दिवेश हुश्श म्हणत जरा स्थिर उभं रहायला मिळणार म्हणत होता तोवर… ” हनी हनी,कम ऑन.लेट अस हॅव चाॅकलेट…” असं लडिवाळ म्हणत ‘बड्डे गर्ल’ स्वीटी त्याचा जाडजूड हात हलवायला लागली.
असं कोणी हलवलं की दिवेशचा तो अगडबंब रेग्झिन सूट सगळाच हलतो.आडव्या तिडव्या मजेशीर दिसणा-या ढेरपोट्या हनीच्या आत कार्टून काटकुळा, परिस्थितीने ओढलेला दिवेश कोणालाच दिसत नाही.या दिवेशने असं घामाघूम होत पार्टीतल्या लोकांचं मनरंजन केलं तरच रोख पैसे मिळणार.तरीही आज दिवेशला उभं रहाणं कठीण होतं.दिवेशने एकदा तो सूट चढवला की पाणीही पिता येत नाही.चाॅकलेट कुठचं खातोय ?
पण पोरांना चेव आला.ह नी…ह नी म्हणत सगळी झोंबलीच दिवेशला.दिवेशने चेह-यावरच्या जाळीदार खिडकीतून मॅनेजर कुठे दिसतोय का पाहिलं.तो निदान या भुतावळीला आवरेल तरी.पण छेः ! तो स्पीकरवर पोरांना ज्योक सांगतोय.
तोल जाऊन पडलाच दिवेश…!
जाड सूटमुळे लागलं नाही म्हणा.पण आतल्या आत धडपडून गडबडगुंडाच झाला सगळा.
पोरांना हा ही त्याचा एक गेम वाटून सगळीच हा हा करून खिदळायला आणि दिवेशच्या भल्या मोठ्या अंगावर चढायला लागली.
दिवेशला हे काहीच सहन होईना.
कसाबसा उभं रहात धडपडत तो मॅनेजरच्या दिशेने गेला.पोटात भूक खवळलेली… उद्याचा कल्पेशचा पेपर…आजारी माई… सगळंच चवताळलं…त्याला कोरोनाचा राग आला…त्याला परिस्थितीचा संताप आला… तो स्वतःवरच कमालीचा भडकला.
त्याला वेडावाकडा येताना बघून मॅनेजर धावला.त्याच्या पाठीवरची चेन उघडून त्याचा ड्रेस सैल केला. त्याला मोकळ्या हवेत उभा केला.
” मॅनेजर, प्लीज लेट मी गो नाऊ. मला आज अनइझी वाटतंय.तुम्ही मला माझे पैसेही देऊ नका.” तो चिरडीला आला.
” दिवेश, प्लिज, अर्ध्यावर नको जाऊ मित्रा.ती बनी बघितलीस ? आज मेरी तापाने फणफणलीय म्हणून तिची आजी…सबीनाआंटी आलीय. तिने चढवलाय बनीचा ड्रेस. झेपत नाहीये तिला तरी नाचतेय ती या कार्टून ड्रेसमधे.पोटासाठी..सकाळपासून या आजीनातीने चहापण नाय घेतला.आता आजी इथले पैसे घेऊन घराकडे जाईल आणि खातील काहीतरी.प्लीज यार,सगळ्यांचीच अडचण आहे. तू अर्ध्यावर गेलास तर रेप्युटेशन खराब होईल माझं यार, पैशे कापतील ते कापतील आणि परत कोण काम नाय देणार.माझी इन्वेस्टमेंट आहे …यार… “
इतक्यात , ” मॅनेजर सायबा, अरे मात कोल्ड्रींकाचो घोट तरी पाज बाबू.घसो शाप सुकलो रे पात्राव…!” असा सबीनाआंटीचा थरथरता स्वर कानावर पडला.
तिच्या ड्रेसचं अवाढव्य धूड सांभाळत आंटी हेलपाटत चालत होती.
दिवेशने स्वतःला सावरलं.
हनीबनीवर फंक्शन..फंक्शनवर मॅनेजर…मॅनेजरवर दिवेश…दिवेशवर माई आणि अंध कल्पेश… या सगळ्यावर कमाई…आणि कमाईवर खर्चांची तोंडमिळवणी…. सगळं कसं एकमेकावर घट्ट अवलंबून… कोणालाच ही कडी सोडून जाता येणार नाही… !
दिवेशने पाण्याची बाटली रिचवली आणि ड्रेसची चेन लावण्यासाठी मॕनेजरकडे पाठ करून उभा राहिला.आव्हानांना सामोरा होऊन…!
शेवटी परिस्थितीच्या रेघेसमोर जिद्दीचीच मोठी रेघ ओढायला लागणार !
लेखिका : सौ. वैशाली श्रीनिवास पंडित. ( मालवण ,जि.सिंधुदुर्ग)
(फोटो सौजन्य : गुगल)