कणकवली | प्रतिनिधी : २ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच गोपुरी आश्रमच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गोपुरी आश्रम येथे महात्मा गांधी व व्यसनमुक्ती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रावेळी गोपुरी आश्रमचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी गांधीजींच्या अनेक रचनात्मक कार्यापैकी व्यसनमुक्ती हे कार्य तितक्याच तळमळीने व आजच्या परिस्थितीत प्रभावशाली करण्याची गरज आहे व हे कार्य नशाबंदी मंडळाच्या मदतीने गेली पंधरा वर्षे गोपुरी आश्रम येथे सुरू आहे. गांधीजींचे अनुयायी कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी गांधीजींच्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठीच गोपुरी आश्रमाची स्थापना केली. गेली ७५ वर्ष सातत्याने सुरू आहे. असे विचार व्यक्त केले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष रवींद्र मुसळे गुरुजी यांच्या हस्ते नशाबंदी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व तसेच व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच गोपुरी आश्रमच्या संचालिका, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी जिल्ह्यात वाढत असलेली व्यसनाधीनता थांबविण्याचा प्रयत्न यापुढे सातत्याने केला जाईल. गोपुरी आश्रमात स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचा समाजाने उपयोग करून घेवून व्यसनमुक्तीच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात गोपुरी आश्रमचे खजिनदार अमोल भोगले, व्यवस्थापक बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे आणि नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समिती सदस्य रीमा भोसले आदी. मान्यवरांनी या चर्चासत्रात भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. शेवटी जय जवान जय किसान जय व्यसनमुक्ती हा नारा देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.