केंद्रीय मंत्री खासदार श्री नारायण राणे सुद्धा मागच्या दारानेच खासदार झाल्याची टीका.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मनविसे तालुका प्रमुख धनराज गोरे यांनी विरोधकांना मनसेच्या पदाधिकार्यांवर टीका न करता स्वतःला अभ्यासण्याचा सल्ला दिला आहे.
ज्यांना आचारसंहिता काय असते हे माहीत नाही त्यांनी प्रथम प्रशासकीय अधिकाऱ्यांची आचारसंहिता याचा अभ्यास करावा. कोणाच्या घरी जाऊन प्रशासकीय अधिकारी बैठका घेत असतील तर सर्वजण आपापल्या घरी बैठकांसाठी अधिकाऱ्यांना बोलावतील असे उपरोधक विधान धनराज गोरे यांनी केले आहे.
आमदार नितेश राणे हे जरी लोकांमधून निवडून आले आहेत व सध्या सत्ताधारी आमदार असले तरी जिल्ह्यात इतरही आमदार लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत. ते देखील जनतेच्या प्रश्ना संबंधित चर्चेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपापल्या घरी बोलावतील. सत्ताधारी आमदार नितेश राणे यांना हे सहन होईल का असाही सवाल त्यांनी केला आहे. जे राजकारणात नवखे आहेत ज्यांना कसला राजकारण समाजकारण याचा गंध नाही त्यांनी टीका करताना सर्व बाबी लक्षात घ्याव्यात असाही टोला त्यांनी लगावला आहे.
दया मेस्त्री यांना खंडणी गुन्ह्यांबाबत न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. कोणताही गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालेला नाही. तसेच माजी आमदार परशुराम उपरकर हे मागील दाराने निवडून आले असतील तरी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हे देखील मागील दारानेच निवडून आले आहेत हे लक्षात घ्यावे असे धनराज गोरे यांनी भाजपातील मनसे विरोधकांना सुनावले आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. अनेक भ्रष्टाचार उघडकीला आणून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर घालवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांचे राजकीय व सामाजिक योगदान मोठे आहे याचे भान कवडीमोल व वायफळ टीकाकारांनी यांनी ठेवावे असा सल्ला कणकवली मनविसे तालुका प्रमुख धनराज गोरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज जिल्ह्यात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. मनसेकडे कार्यकर्ते कमी असले तरी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्यास कमी पडत नाहीत. हे जिल्ह्यातील जनतेला चांगलेच ज्ञात आहे. मनसेला जिंकून येता आले नाही तरी मनविसे कडे ठरवतील त्याला पाडण्याची ताकद आहे. भविष्यात मनसे देखील सत्तेत असेल हे अधोरेखीत करून ठेवा, असा उपरोधी टोलाही धनराज गोरे यांनी लगावला आहे.