मालिकेतील चुरस कायम.
सुयोग पंडित | क्रिडा : नागपूर येथे खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी ट्वेंटी मालिकेतील दुसर्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे.
पावसामुळे केवळ प्रत्येकी ८ षटकांच्या खेळविल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले.
पहिली पाच षटके भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी कर्णधार रोहीत शर्माचा हा निर्णय सार्थ ठरवला. मागील सामन्यातील नायक कॅमेरून ग्रीन लवकर धावबाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने त्यानंतर मॅक्सवेल आणि टीम डेवीडला त्रिफळाचित करत ऑसी फलंदाजीच्या फळीला खिंडार पाडले. एका बाजुने कर्णधार ॲराॅन फिंचने काही षटके फटकेबाजी केली परंतु पुनरागमन करणार्या जसप्रीत बुमराहने त्याला एका अप्रतिम याॅर्करवर त्रिफळाचित केले.
हाणामारीच्या षटकात मॅत्थ्यू वेडने फटकेबाजी करत ४३ धावा जमविल्या.
विजयासाठी निर्धारित ८ षटकांत ९१ धावांचा पाठलाग करणार्या भारताने तडाखेबंद सलामी देत केवळ तीनच षटकांत३९ धावा केल्या. नंतर मात्र के.एल.राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांना झटपट बाद करत ऑसीज गोलंदाजांनी भारतावर दडपण आणले.
परंतु कर्णधार रोहीत शर्माने एक बाजू पाच षटकार व तीन चौकार मारुन नाबाद ठेवली होती.
शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने पहिल्या दोन चेंडूवर एक षटकार व एक चौकार फटकावत केवळ २ चेंडूत नाबाद १० धावा ठोकत भारताला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
कर्णधार रोहीत शर्माने केवळ २० चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.
आता या मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना २५ सप्टेंबरला हैद्राबाद येथे होणार आहे.
अभिनंदन टिम इंडिया