कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या आंदुर्ले गांवात कापडोसवाडी येथील कोनकर यांच्या परसबागेत गवारेड्यांनी धुमाकूळ घातला. भाज्या फस्त केल्या, तर काही उत्पादनांची अक्षरशः नासधूस केली. शेत मांगराचेही दोन पत्रे फोडले.
यात राजाराम रघुनाथ कोनकर यांचे अंदाजे लाखभराचे नुकसान झाले. आंदुर्ले गावातील कापडोस येथील ३० ते ४० गुंठे क्षेत्रात राजाराम कोनकर व त्यांच्या कुटुंबाने परसबाग तयार केली होती. तसेच भातशेतीही केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही परसबाग व काही भातशेतीचे गवारेड्यांनी नुकसान केले. यात मुळा, लाल भाजी,काकडी, चिबूड, भेंडी, कणगी, हळद, मिरची आदींसह भातही फस्त केले. सात ते आठ गवारेड्यांचा हा कळप असून कोनकर यांचे उत्पादन गवारेड्यांनी पूर्णतः नासाडी केले.