इझी डिज़ी | सदर ( भाग :२ )
मालवण | सुयोग पंडित : सध्या सोशल मिडिया कसा आहे हे जाणणारे तज्ञ विपुल प्रमाणात आहेत परंतु सोशल मिडिया ‘का’ आहे हे जाणणार्या लेखकांपैकी महाराष्ट्र राज्यातले एक नांव म्हणजे लेखक ‘श्रीकांतसुत..!’
लेखक श्रीकांतसुत हे वाचन व लेखनप्रेमी कुटुंबात जन्मले. सोशल मिडियावरील त्यांच्या लेखनामध्ये त्याचे तसे संदर्भ थेट आढळून आले नसले तरी सोशल मिडियावरीलच त्यांच्या एका मुलाखतीद्वारा त्याचा उलगडा अवघ्या महाराष्ट्र राज्याला झाला होता.
श्रीकांतसुत हे शब्दांची भव्यता शक्य असूनही स्वतःला शिवू देत नाहीत. जी गोष्ट सहज साध्या पद्धतीने पचनी पाडायला हवी तिला वेष्टने आणि इतर पदर न चढवता वाचकांपर्यंत थेट पोहोचवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. आपण लिहीतो ते विचार जरी गुंतागुंतीचे असले तरिही ते विचार व तो गुंता सोडवून देऊन लेखन करणे म्हणजेच खरे ‘लेखन करणे’ आहे अशी त्यांची लेखक म्हणून धारणा आहे. यासाठीच ते सिध्दहस्त लेखकापेक्षाही वेगळे व सहज असे ‘सीध़ा हस्त’ लेखक म्हणून परिचयाचे आहेत.
‘श्रीकांतसुत’ हे त्यांचे नांव तसे प्रचलीत नाही परंतु ते त्यांच्यातील लेखकाला त्यांच्याच लेखक वडिलांचे अपत्य मानतात म्हणून आपण तो उल्लेख आज ‘श्रीकांतसुत’ असा केलाय.
त्यांचे वडिल हे सुद्धा सीध्या हाताने लिहिणारे लेखक होते.
शब्दांच्या गुलबक्षी माळांपेक्षा त्यांना वाचक सेवेसाठी सरळपणाच्या सोनचाफ्याच्या छोट्याच पण पुण्यकर्मी फुलाला अर्पण करण्याची आवड होती. मग तो विषय कोणताही असो. त्यांचे नाटक संहिता तथा नाट्य लेखन या प्रकाराकडे जास्त रस होता. स्वतः श्रीकांतसुत व त्यांच्या धाकट्या भावाने बालपणापासून त्यांचे वडिल कै. श्रीकांत यांची अनेक नाटके तथा नाट्यसंहीतांचे लेखन केले आहे.
वडिलांच्या एकेका शब्दाला झेलत स्वतःच्या बुद्धीत पाझरुन घेऊन स्वतःला लेखक म्हणून घडवणे हीसुद्धा एक किमयाच म्हणावी लागेल. श्रीकांतसुत व त्यांच्या वडिलांच्या लेखन शैली ‘नक्कल’ वगैरेत नाहीत हे श्रीकांतसुत यांनी साध्य केले आहे हीच ती किमया आहे.
स्वतः श्रीकांतसुत यांचा अभिनय क्षेत्राकडेही ओढा असल्याने व त्यात निर्विवाद ‘मंच मुग्धता’ असल्याने ते स्वतः नाटक लिहीताना मंचाच्या नेपत्थ्य,प्रकाश योजना व ध्वनी योजनेसह विचारपूर्वक अशी पात्रांची शब्दबोली समजून लेखन करतात. मंचाचा एकेक कोपरा ते लेखनातून उभा करु शकतात हेच खरे…!
श्रीकांतसुत यांच्या वडिलांनी त्यांच्या नाट्य व सादरीकरण क्षेत्रातील प्रगतीवर मात्र ‘बापाचे लक्ष’ ठेवले होते. त्यांनी कधीच श्रीकांतसुत यांच्या परीक्षेतील गुणांची चौकशी केली नव्हती परंतु नाटक,सादरीकरण,लेखन, अभिनय वगैरेत श्रीकांतसुत यांनी हयगय केलेली त्यांच्या वडिलांना खपत नसे. परिणामी एक सहज साध्य लेखक महाराष्ट्राला मिळाले.
गेले दिड दशक सोशल मिडियावरील त्यांच्या हजारो लेखनांना लाखो वाचकांनी अनुभवलेले आहे. विश्वातील जवळपास सर्व मुद्द्यांवर अगदी सहज मोरपिसी सरळता आणून त्यांनी त्यांची लेखन सेवा दिलेली आहे. अगदी तासाभरापूर्वी घडलेल्या एखाद्या सामाजिक,राजकीय किंवा कोणत्याही घडामोडीवर जेंव्हा श्रीकांतसुत लिहितात तेंव्हा असे वाटते की ती घडामोड कित्येक दिवसांपूर्वी घडलेली होती व त्यावर दीर्घ अभ्यास करुन श्रीकांतसुत यांनी ती सरळ सोपी करुन वाचकांपर्यंत आणलेली आहे किंवा श्रीकांतसुत यांनी लेखन आधी केले होते आणि नंतर ती घटना घडलेली असावी इतकी तपशीलवार तरिही सरळपणे ती वाचकांपर्यंत पोहोचते. नवाझुद्दीन सिद्दिकी यांचा ‘किक्’ सिनेमातील एक संवाद आहे. नायक म्हणजे सलमान ख़ान, खलनायक शिवगज़रा म्हणजेच नवाझुद्दीनला एक लंबाचौड़ा संवाद फेकतो त्यावर नवाझुद्दीन एक सेकंदाचा पाॅज घेऊन त्याच्या सहकार्यांना एकच वाक्य सांगतो ,” ए…इसे मारो…!” अगदी तीच सहज, सोपी उद्देशाची सहजता श्रीकांतसुत यांच्या लेखनात आहे. थोडक्यात् ते ‘ताकाला जाऊन भांडं लपवत बसत नाहीत!’
इजी डिज़ी हे सदर सोशल मिडियावरील सहज साधे लेखन करणार्या लेखकांचे आहे. यात कदाचित श्रीकांतसुत हे वाचकसंख्येमध्ये सार्वकालीन श्रेष्ठ निश्चितच असतील परंतु ते श्रेष्ठत्व ज़डत्व बनून त्यांच्या लेखनामध्ये कधीच डोकावत नाही. खूपदा क्षुल्लक, सवंग वाटू शकणार्या गोष्टीवर प्रकाश टाकणे हे साहित्यिकांना शक्य नसते तिथेच श्रीकांतसुत संपूर्ण ‘सामाजिक उजवे व श्रेष्ठ’ ठरतात.
नुकतेच त्यांच्या ‘क्वारंटाईन’ या कथेला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील कथाकथनात रौप्य पदक प्राप्त झाले तर त्यांच्या ‘सगळं ओकेमध्ये’ नाटकाला सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर जबरदस्त यश मिळाले आहे. यापैकी ते नाटक तर त्यांनी अवघ्या काही तासात लिहून दिलेले होते हे विशेष..!
योगायोगाने आजच ‘श्रीकांतसुत’ यांचा वाढदिवस आहे.
त्यांचे वाचक व संपूर्ण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहातर्फे त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा.
सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)