इझी डिजी ( सदर ) | भाग : १
मालवण | सुयोग पंडित : आपल्या जीवनामध्ये खूप काही सुप्त आहे हे जाणताना जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जिवामध्ये काहीतरी ख़ास आहे हा विश्वास ठेवून त्यांना कल्पनाशक्तीने बोलते करु शकणारे सहज लेखनातील एक नांव म्हणजे आनंद विष्णू शेमडकर.
अमूक एका विषयांतच गुरफटवून घेऊन किंवा स्वतःची शैली विकसीत करण्याचा ध्यास ठेवून लेखन न करता निव्वळ स्वतःला जसे भावते तसे अस्सल शब्दांमध्ये मांडणे ही आनंद यांच्या लेखनातील ठळक बाजू आहे. कच्चेपणा म्हणजे अर्धकच्चेपणा नसतो तर तो कृत्रिम पापुद्र्यांशिवाय मांडलेला निर्भेळपणा असतो हे आनंद यांचे छोटे व दीर्घ ललित लेखन, विविध पोस्टवरील भाष्य आणि त्यांच्या सहज उद्गारांतून स्पष्ट होते. ‘काहीही हां..’, किंवा वरवर बालीश असे वाटणारे विचार खरेतर अस्सल व उत्स्फूर्तपणे आलेले असतात आणि त्यांना निर्भिडपणे मांडायची ताकद आनंद विष्णू शेमडकर यांच्यात आहे.
त्यांची सामाजिक स्तरावर थेट सहभाग घ्यायची वृत्ती त्यांना निसर्ग,सिनेमा,खेळ,जीवन,पशूपक्षी,खाद्यपदार्थ,संगीत,मानवी वृत्ती, परंपरा आणि इतर सर्वच घटकांवर खळाळून लेखन करायला उद्युक्त करतात आणि ते प्रांजळपणे उद्युक्त होतात. सोबत स्वरचित मिम्स तथा व्यंगचित्रे तयार करुन ते उपहास,स्वगत अशा विविध कल्पनांनाही सादर करतात.
आनंद विष्णू शेमडकर यांच्या खळाळामध्येही अनुभवांच्या अभ्यासाची विद्वत्ता आहे. ती विद्वत्ता साधेपणाने स्विकारून लेखनामध्ये तिला बढ़ेजावाने न आणता ते सादर होतात म्हणून ते लेखनाचा निर्झर ठरतात.
‘इझी डिजी’ म्हणजे डिजीटल मंचावर सहज लेखन करणार्या आनंद विष्णू शेमडकर यांना त्यांच्या सहज निर्झर लेखन व त्यांचे वाचक ही संख्या न रहाता ती एक ‘आनंदजत्रा’ असते.
आपली आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल