कणकवली शहराची सुधारीत विकास योजना तयार करण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेली बैठक अयोग्य असल्याचे मनसे नेते परशुराम उपरकरांचे मत.
कणकवली | ब्युरो न्यूज : माजी आमदार व मनसे नेते परशुराम उपरकर यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराची सुधारीत विकास योजना तयार करण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेली बैठक अयोग्य असून ती बैठक कमातकमी सात दिवसांची मुदत देऊन बैठक लावण्याची गरज होती मात्र तसे न करण्यात आल्याने नागरिकांना आवाहन करून मुदत देऊन ही बैठक पुन्हा आयोजित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने कार्यवाही करून बैठक आयोजित करावी, अशी मागणी माजी आम. परशुराम उपरकर यांनी केली आहे. तसेच याबाबत मनसे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.
नगरपंचायत प्रशासनाकडून ७ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार शहराची सुधारीत विकास योजना तयार करण्यासाठी जी प्रक्रिया सुरू आहे, त्यात लोक सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरून विकास योजनांमध्ये स्थानिक लोकांद्वारे सुचविण्यात आलेल्या आवश्यक सुविधा विचारात घेऊन विकास योजना तयार करता येणे शक्य होईल. त्यादृष्टीने गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शहरातील उद्योजक, वास्तुविशारद, सामाजिक कार्यकर्ते व इतर भागधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुळात ७ सप्टेंबरला पत्र काढून ८ रोजी तातडीने बैठक लावण्यामागचा उद्देश काय? अशाप्रकारे बैठक आयोजित करून या विकास योजनेत घोळ घालण्याचा हा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी बैठक आयोजित करून काही सोयीचे भाग वगळावे व काहीच समावेश करून घ्यावे यासाठीचा तर हा प्रयत्न नाही ना? सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे, लोक गणेशोत्सवात असताना एका दिवसात ही बैठक आयोजित करून सोपस्कार पूर्ण केले हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांकडे आज गणेशोत्सव आहे तर उद्या अनंत चतुर्दशी असल्याने लोकाना अशा प्रकारची तातडीची बैठक न लावता संबंधितांना सात दिवसांची मुदत देऊन त्यांच्याकडून अभिप्राय, सूचना घेऊनच प्रस्ताव तयार करण्यात यावा अशी मागणीही परशुराम उपरकर यांनी केली आहे.