मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात एका बारा वर्षांच्या मुलाने “दुनिया बनाई मैंने हाथों से मिटटी से नहीं
जज़्बातों से” या भक्तीगीतांच्या ओळींना समर्पक अशी गोष्ट साकार केली आहे.
शहरातील मेढा भागात रहाणार्या कु.लौकिक श्रीगणेश मालवणकर याला बालपणापासून कलेची आवड होती. चित्रकला, रांगोळी, मूर्ती बनवणे, कागदी नक्षी काम, संगीत अशा कला क्षेत्रातील विविध प्रकारांमध्ये त्याला सहभाग घेऊन काहीतरी करण्याचा रस आहे.
लौकिकला गेल्यावर्षी पासूनच श्री गणेशाच्या मूर्तीच्या निर्मितीचे वेध लागले होते. ठोस अशी निर्मिती कला माहीत नसूनही त्याची कलेला भुकेली नजर इतर गणेश मूर्तींचा अभ्यास करत करत त्याच्या बाल मनाने अगदी स्वावलंबीपणे त्याचा श्री गणेश साकारायला घेतला.
ही श्री गणेश मूर्ती साकारणे त्या बालमनासाठी खूप उत्सुकतेचे जरी असले तरी त्या बाल हातांसाठी तितके सोपे नव्हते पण लौकीकने जिद्द सोडली नाही. त्याची मूर्ती तयार झाली परंतु त्यानंतर एका मांजराने तिच्या बाजुने उडी मारली आणि लौकीकच्या पूर्ण बनलेल्या बाप्पाची सोंड तुटली.
आता लौकीकही तुटला परंतु त्याच्या आईच्या सक्षम प्रोत्साहनामुळे आणि त्याच्यातील स्थितीज गणेश ऊर्जेमुळे त्याने पुन्हा श्री गणेश मूर्ती निर्मितीचा श्री गणेशा नव्याने केला. मागील चुका टाळत आणखीन काही राहीलेल्या रचना साकारत लौकीकने अखेर स्वकष्टाने ‘त्याचा बाप्पा’ साकारलाच..!
परमाश्वराचे अस्तित्व शोधताना त्याच्यावरील श्रद्धेने त्याला मातीतून सकारात्मक मूर्तीरुप देणार्या लौकीक श्रीगणेश मालवणकर सारखे बालक ही परमेश्वराच्या अस्तित्वाची चुणुकच म्हणता येतील.