संतोष साळसकर | ब्युरोचीफ : जगविख्यात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांच्या कारला पालघरनजिक भीषण अपघात होऊन सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने विशेषकरुन काॅर्पोरेट जगत आणि राजकीय वर्तुळात शोकाचे वातावरण आहे.
आज दुपारी 03:30 च्या दरम्यान पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. 2016 साली न्यायालयीन वादानंतर सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सायरस मिस्त्री यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.