मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे कावावाडी येथील समीर पेडणेकर आणि कुटुंबियांच्या घरात गणपतीला दर दिवशी तब्बल तीस नैवेद्याची ताटे दाखविण्यात येतात.
एकूण सहा बिऱ्हाडे या पेडणेकरांच्या घरात असून प्रत्येक बिऱ्हाडाची पाच ताटे अशी एकुण तीस ताटं प्रती दिवशी प्रसादासाठी दाखविण्यात येतात. कावावाडीतील पेडणेकरांचे हे घर सर्वात लांब घर म्हणून ओळखले जाते. घराची लांबीच तब्बल एकशे दहा फूट असून रुंदीला पंचावन्न फुट आहे. सर्व मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी न चुकता गावी येतात. व्यावसाईक रंगभुमीवरील प्रसिद्ध नाट्य निर्माते दिनू पेडणेकर यांचे सुद्धा हेच घर आहे.
तीस नैवेद्याची ताटं बनविण्यापूर्वी जेवणातील मेन्यू सुद्धा अगोदर सर्व महिला विचार विनिमय करून ठरवतात. जेणे करुन कुठलाही पदार्थ दोनदा बनवला असे होऊ नये हा हेतू त्या मागे असतो. त्यामुळे रोजच सहा वेगवेगळ्या भाज्या, गोड पदार्थ खायला मिळतात. गणपतीला दाखविलेल्या नैवेद्याची ताटं घेऊन कुटुंबियांची तसेच आलेल्या पाहुण्यांची पंगत गणपतीच्या समोरच बसते. एकाच वेळी गाव जेवण असल्याप्रमाणे सर्व पेडणेकर बंधु जेवायला बसतात. या पंगतीला आधि पुरुष, लहान मुले आणि नंतर स्त्रिया बसतात. नोकरी धंद्या निमित्त बाहेरगावी असणारे या परिवारातील सदस्य गावी येत असल्यामुळे गणपतीचे अकरा दिवस घर एकदम माणसांनी भरुन जाते. अकरा दिवस का असेना या उत्सवाच्या निमित्ताने विखुरलेला पेडणेकर परिवार एकत्र येऊन एक प्रकारचे गेट टुगेदरच साजरे करतो.