एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथे गोव्यातून कुडाळच्या दिशेने होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याच्या ४२० बाटल्या व बिअरचे १२० टीन अशी एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची स्विफ्ट कार (एमएच ०४ जीई ९०९८) असा एकूण ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी श्रीकृष्ण सुभाष कदम (३२, रा. हुमरमळा ,अणाव, ता. कुडाळ) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई कोल्हापूर विभागीय आयुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.
बेकायदेशीर दारु वाहतूक प्रकरणातील कारवाईची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकरणे दुर्मिळ असल्याने जिल्ह्यातील या युवकाला अटक झाल्याने थोडी खळबळ उडाली आहे.