मालवण | संपादकीय : तिथीनुसार सण येतात.तिथीनुसार वार्षिक दिवस,प्रसंग येतात.
हे आपल्याला कसे कळले…?
सर्वांनाच कळेल अशी एक प्रणाली तयार करुन आपण किंवा आपल्या आधीच्या सर्वांनी ती जगभर वापरणे सुरु केली आणि अंगवळणी पाडली.
त्याआधीही तिथी म्हणजे ढोबळमानाने तारीख व वार हे सुद्धा आकाशातून पडलेले नव्हते तर त्यांना अभ्यासानुरुप ,ग्रह तार्यांच्या स्थितीनुसार आपण नांवे देत गेलो.
अगदी एकेका सेकंदाची स्थिती कशी होती ह्याच्या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या. अशा नोंदी करता करता लक्षात यायला लागले असावा की साधारण तीनशे साठ दिवसांनी पुन्हा सगळे त्याच स्थितीत,तशाच चक्रात वगैरे येते. हे लक्षात येताच तिथे एका विरामाची खूण रोवली गेली आणि तिला वर्षं म्हणले गेलं असावे. वर्षातील प्रसंगांचे भाग करुन महिने केले गेले असतील जेणेकरुन निरीक्षणांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा.
ह्या सगळ्या शक्यता आहेत. हे असेच असावे ही खात्री नाही आणि नसावेच असेल कोणी सांगितले तरी तो वादाचा मुद्दाम नसेल.
पण ह्या गणनेला आपण ब्रम्हगणना म्हणतो.
ती गणना करायला काही ‘टाईम किपर’ असतील ज्यांना ब्राम्हण म्हणून संबोधले गेले.
प्रामाणिकपणे व अव्याहतपणे एकेका ग्रह तार्यांच्या क्षणाक्षणांत बदलत जाणार्या स्थितीवर लक्ष ठेवून, त्याच वेळी पृथ्वीवरील परीस्थितींमध्ये होत जाणारे बदल नोंदवत ,नोंदवत ‘मुहूर्त’ ही बाब जन्माला घातली गेली .
ह्यात लक्षात हे घ्यावे की हे सगळे ‘मानण्यापासूनच’ सुरु झालेले.
आपल्याला पुढच्या व मागचा दोन्हीबाजुच्या अध्ययनासाठी कुठल्यातरी एका ठोस गोष्टीची गरज लागते.
तोच मूळारंभ तथा ‘श्रीगणेशा..!’
प्रत्येक मानलेल्या मूळारंभाचे कितीतरी मूळारंभ असतात. मनुष्यजनन्म,पिढ्या शतकानुशतके मोजून फोड करत बसले तरी शक्य होणार नाही म्हणून दोन शब्दांत,अर्थात् ,”अनादी अनंत” म्हणून त्याची व्याप्ती सांगायचा आपण अध्यात्मिक व धार्मिक प्रयत्न करतो.
ह्या सगळ्या अभ्यासाच्या खुणांची रोजनिशी किंवा क्षणनिशी म्हणजेच पंचांग.
ज्यांनी इमाने इतबारे,स्थिती अभ्यासून त्या लिहून ठेवुन नोंदवल्यात त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली.
हे सगळे घडत असताना मनुष्याला ,’पोट व भूक’ होते. त्यासाठी टाईम किपर सोडून इतरजण झटत राहीले. टाईम किपर्स क्षणाक्षणांच्या स्थिती सांगून अमूक स्थितीत कसा पाऊस असतो,कशी भरती व ओहोटी असते,प्रकाश कसा असतो व त्यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन कुठले पिक कसे उत्तम घेता येईल ह्याचीही माहिती सांगू लागले म्हणजे टाईम किपर्सचे ‘संशोधक’ ह्या शब्दांत आपण रुपांतर केले.
काळ पुढे सरकत असतो.आता टाईम किपर्सचं कुतूहल सगळ्यांनाच होते. म्हणजे फावल्या वेळात काहींना ते संशोधन करायची इच्छा झाली.
शेतकरी,कुंभार,लोहार,सोनार,चर्मकार,मेंढपाळ,गवळी,नाभिक वगैरे कामं करणारी मंडळीही माणसेच.
त्यांनी कामे सांभाळत हा अभ्यास,स्थिती व मानवी वृत्तीला स्थैर्य देण्यासाठी कधी मधुर तर कधी कडक शब्दांतून निसर्ग जाणिवा द्यायचे सहज व निःस्वार्थी प्रयत्न केले त्यांना आपण ‘संत’ म्हणू लागलो. ब्रम्ह जाणणारे माणसांचे ‘अपग्रेडेड व्हर्जन’ म्हणजेच संत आहेत. ते मानवी चेहरा,स्वभाव,नैसर्गिक स्थितीमागची भौगोलीक व अवकाश स्थितीही अभ्यासून गेले म्हणून ते ‘भगवंतांच्या जवळचे’..! ह्या सगळ्यात प्रपंचही ते उत्तम सांभाळायची जाणिव देत होतेच.
म्हणजे पोट भरीच्या प्रयत्नांनंतरचा वेळ उणीदुणी न काढता त्या कालचक्राची महती ,भविष्याची खबरदारी म्हणून अभ्यासणे म्हणजेच विधात्याच्या नजिक येण्याचे प्रयत्न ठरले.
हे सगळं घडताना आपण प्रगत व साक्षर होत गेलो. आता सर्वांतील सर्वांनाच लिहीता वाजता येऊ लागले.
सामाजीक कृतज्ञता म्हणून ज्यांनी टाइम किपर्सच्या भूमिका इमाने इतबारे पार पाडल्या त्यांच्या पुढील पिढ्यांकडेच ती जबाबदारी अघोषीत अधिकृतपणे दिली गेली किंवा राहिली ही बाब मानवी वृत्तीच्या संशोधकांनी निःस्वार्थीपणे अभ्यासली. त्या माणसांना आपण ‘समाज सुधारक’ म्हणतो.
समाज सुधारक ही सुद्धा माणसेच. त्यांच्याही मर्यादा तुमच्या आमच्यासारख्याच. पण त्यांचे जीवन एका स्वयंप्रकाशाचा झरा असते.
समाज सुधारणा ही गोष्ट समाजाच्याच हीताची असल्याने कोणाच्या श्रद्धेला वगैरे दुखावून ती अशक्यच असते .
श्रद्धेची स्थिती सश्रद्धेकडे न्यायचे कर्तव्य म्हणजेच समाज सुधारणा. ही बाब जाणलेली माणसे खरी समाज सुधारक.
आपण बुवाबाजी,भोंदूबाजी करणारी माणसे पहातो तेंव्हा हे लक्षात येतं की ती माणसेही ऊपजत अभ्यासूच आहेत किंवा होती. पण त्यांच्यातला हव्यास गुण हा सांभाळता नाही आला त्यांना व सामाजीक गुन्हेगारीच्या कचाट्यात अडकली.
शेवटी समाजानेच दिलेली अभ्यास जबाबदारी जर समाजविघातक ठरु लागली तर समाजाने किती व का माफी द्यावी? त्याच कालचक्र व सामाजीक वृत्तींचा अभ्यास केलेले ‘न्यायालय’ हे मंदिर उदयास आले.
आता कोणतेही काम करणार्या पूर्वजांच्या पिढ्या अक्षर व अंक ओळखी होत होत्याच.
त्यांनी व टाईम किपर्सच्या पुढील पिढ्यांनीही अभ्यास,सराव व सर्वानुमताने सामाजीक नियम बनवले त्यालाच आपण कायदा म्हणतो.
हे सगळे लक्षात घेतले की ‘कोदंडधारी’ ह्या शब्दाची उकल होईल.
आजच्या स्थितीला आपण सगळेच माणसाची अपडेटेड व्हर्जन्स आहोत का..?*ह्या प्रश्नाचे उत्तर पैसा,दागिने,गाड्या,महागडी गॅजेटस्,पदव्या अशा दृष्य भौतिक सोयींमध्ये मध्ये मिळत नाही.
जर अक्षरांमागचा प्रत्येक श्रीगणेशा ओळख घेता येत नसेल तर आपण सश्रद्धाळू कसे काय व सुशिक्षीत तर नाहीच..!
जाती ह्या मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांना पूरक आहेत. आज बॅन्केत काम करणार्या एका अमूक कॅशीयरने तो सामाजीक शिक्षण कालचक्राचाच मापदंड असलेला अभ्यास करुन ते स्थान भूषवलेलं असते म्हणून तो म्हणजे पैश्याची मशीन नसतो.
तसेच ब्रम्ह जाणणारा किंवा अभ्यासणारा निर्मात्याला ओळखत बिळखत असतो हे सुद्धा थोतांड आहे. फक्त जर तो इमाने इतबारे त्या कालस्थितींचा अभ्यास करत असेल व जशास तशा समाजापर्यंत पोहोचवत असेल तर तो नक्कीच कौतुकपात्र ठरतो. आज शिक्षणाने हे कोणीही करु शकतोच. त्याला जातीची व धर्माची अट नसते हे सिद्ध झाले आहे. एखादा माणुस उपजत कुतुहलाने काही कौशल्य थेट शिकू पहातोय तर त्यालाही उच्च शिक्षणाची बेगडी अट नसावी.
माणसासाठी निसर्ग,पोट,स्थैर्य ,शांती व सामाजीक आनंद महत्वाचे आहेत.ते देणारा व देऊ पहाणारा प्रत्येक जणच ब्राम्हण तथा तोच टाईम कीपर म्हणता येईल.
शेतकरी,शिक्षक,संशोधक,समाज सुधारक,संत,वैद्य,संगितकार,लेखक,कवी, मनोरंजन रचनाकार,सफाई कामगार हे सगळेच वरील मुद्द्यांवर काम करतात….तेच आजच्या घडीचे टाईम किपर्स आहेत.
अमूक वातावरणात अमूक साथ येते,अमूक शारिरीक स्थिती अमूक खाल्ल्याने येते हे डाॅक्टर्स सांगतात..मग काय खावे व कसल्या दर्जाचं खावे ह्यावर संशोधन करुन शेतकर्याला सांगणारे संशोधक व शेतात तसेच इमाने इतबारे,नैसर्गिक शेती करणारा प्रत्येक जण ब्रम्ह अभ्यासकच आहे.
श्रीगणेशा प्रत्येक स्थितीचा, क्षणाचा व गोष्टीचा होतो…करायचा ठरवला तर..!
मोरया…!
खरंच अपडेटेडपणे ,”म्होरं या” म्हणजेच पुढे चालत रहा…हेच खरं मोरया..!
आज एकवीस उद्या बावीस* अशा तारखा जाणणारे अक्षर अंक सुशिक्षितच पण आज एकवीस तारीख व उद्या बाविसमधला प्रत्येक सकार अभ्यासक ब्राम्हणच टाईम किपरच..! त्याला वय,घराणे किंवा वर्णाची ओळख ही गरजेची नाहीय. सर्टिफिकीट द्यायची घ्यायची गरजच नाही.
भेदाभेद म्हणजे सामाजीक वर्गिकरण नसतं. ते जबाबदार्यांचे वाटप असते. सगळे समाजाच्या मंगलमयतेसाठी असले तरच ‘मंगल’ नाहीतर कालचक्र दंड तथा कायदा आहेच …!
माणुस जर कायदा करु शकतो तर माणसाला बनवणार्याचा कायदा किती कडक असेल हा विचारही करु शकत नाही आपण.
निसर्ग त्याची कालानुरुप प्रचिती देतो.
आपण त्या कालचक्रमधून फक्त माफिचे साक्षीदार बनायची धडपड करत असतो.
सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )