बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातल्या निमजगा, गवळीटेम्ब, गडगेवाडी या वाडीतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतर्गत उभारण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी असल्याने याचा फायदा वाडीतील लोकांना मिळत नाही. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याने येथील वासुदेव विजय भोगले यांनी शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत योग्य लेखी उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उपोषणाचे निवेदन श्री भोगले यांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासन, गटविकास अधिकारी सावंतवाडी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व बांदा पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१४-१५ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत या योजनेचा तिन्ही वाडीतील लोकांना लाभ घेता नसून यामध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे, तसेच माहितीच्या अधिकारात माहिती देखील मागविण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढण्यात न आल्याने स्थानिक नागरिक अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. यासाठी या योजनेतील दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व स्थानिकांना न्याय द्यावा या मागणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचे श्री भोगले यांनी म्हटले आहे.