मालवण | संपादकीय : महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एप्रील महिन्यापासून विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.
एप्रिल व मे महिना कदाचित पाण्याची किल्लत ही समस्या असू शकेल असा विचार ग्राहकांनी केला आणि नंतर पावसाळ्यात वार्याची झुळुक जरी आली तरी वीज गायब होणारच असा पारंपारिक अभ्यास असल्याने वीज ग्राहक वीज वितरणाला फारसे जाब विचारत बसले नाहीत.
यंदाच्या वीज गायब होण्याचा एक वेगळाच ‘पॅटर्न’ समोर येतोय तो म्हणजे वीज जाते आणि दुसर्या ते तिसर्या मिनिटाला पुन्हा येते…आणि असे दिवसातून वीस वेळा तरी घडते. आणि दर सोमवारी हक्काची विजेची सुट्टीही असतेच..!
व्यावसायिक व सामान्य नागरीकांच्या दैनंदिन व्यवहारांवर याचा परीणाम होतोच शिवाय अनेक वीज उपकरणांची अक्षरशः वाट लागते. अनेकांनी ए.सी.सारखी उपकरणे कायमची बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि काहींनीतर रेफ्रीजरेटर, वाॅशिंग मशीन्सलाही फाटा देऊन जीवन जगायला सुरवात केली आहे. ही गोष्ट एकवेळ ठीक मानून गौण ठरवली तरिही वायफाय राऊटर्स, वीजेचे बल्ब वगैरे आधुनिक जीवनातील अत्यावश्यक वीज साधनांवरही याचा परीणाम झाल्याने अनेकांना नित्याचे आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहेत.
पर्यटन व दळणवळणात वीजेची नियमितता ही महत्वाची ‘तार’ असते. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ती तार नुकतीच कुठे सुस्वर देऊन छेडू लागलीय असे वाटत असतानाच गेले पाच महिने ही वीज समस्या उद्भवलेली आहे.
या सर्वात ग्राहकांच्या वीज बिलाचे मीटर्स मात्र कोणतीही दयामाया दाखवताना दिसत नाही आहेत हे विशेष..!
सर्वपक्षीय व सर्व व्यावसायिक स्तरावर थोडीफार आंदोलनेही जरुर झाली पण ठोस अशी ही ‘मीटर चालू बत्ती गुल’ ही समस्या काय आहे ते सामान्य माणसाला अजून नेमकेपणाने कळलेले नाही आहे.
कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटां दरम्यान राज्य सरकारने वीजेचा लपंडाव होऊ दिला नव्हता. तो काळ कठीण असूनही वीजेच्या उपलब्धतेबाबतीत राज्य सरकारने कोणतीच कमतरता ठेवली नव्हती हे ही आवर्जून नमूद करावे लागेल…..पण त्यानंतर असे का होतेय..?
या समस्येवर योग्य ती पावले न उचलली गेल्यास आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, दळणवळण व पर्यटन यांसारख्या सामाजिक क्षेत्रात पिछेहाट अटळ आहे.
‘मीटर चालू बत्ती गुल ..ही नेमकी कोणासाठी आहे हुल’ याचा विचार होणे ही गरज निर्माण झाली आहे.
सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)