चिंदर | विवेक परब :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देऊळवाडा मसुरे गावात विविध उपक्रम राबवून आनंदाने साजरा करण्यात आला.
यामध्ये हर घर तिरंगा, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, बालवाडी अंगणवाडीतील मुलांना सकस पोषण आहार, त्याशिवाय महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने साबण बनवण्याचे प्रशिक्षण, मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन पशु विषयक मार्गदर्शन, उत्पादक वृक्ष नारळाचं झाड, मेडिक्लोरच वाटप, शेतकरी वर्गासाठी पशुविषयक योजना मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड जोडणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या जमिनीचे ई पीक पाहणी प्रशिक्षण तसेच बाळ गोपाळाची पंगत हे उपक्रम राबवण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देऊळवाडा व भरतगड हायस्कूल नंबर २ देऊळवाडा इथेही स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शासना मार्फत विविध स्पर्धांचं आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.
यामध्ये तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल भेटवस्तू, पुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्च २०२२ मध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्याना भरभरून शुभेच्छाही देण्यात आल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देऊळवाडा खेरवंद गावातील 75 वर्ष ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक यांना शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच महिला व किशोरवयीन मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
हा संपूर्ण सोहळा विविध उपक्रम राबवल्यामुळे उत्साहात आनंदात पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, भरतगड हायस्कूलचे सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापनचे आजी माजी अध्यक्ष, सीआरपी, मदतनीस, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,तलाठी पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल, ग्रामसंघाचे कार्यकर्ते, अध्यक्ष व सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी वर्ग, नागरिक, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये ग्रामपंचायत देऊलवाडाचा कर्मचारी वर्ग, उपसरपंच, सरपंच सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे.
तीन दिवस सुरू असलेल्या या अमृत महोत्सवांच्या कार्यक्रमामुळे गावातील वातावरणही देश भक्तीमय झाले. एकूणच हे सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात,खेळीमेळीत,
नियोजनबद्ध रीतीने पार पडले.