कणकवली I प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात तहसीलदार आर. जे. पवार यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या जिल्ह्यातील सर्वात उंच असलेल्या ७५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाची दस्तूरखुद्द राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेत तहसीलदार आर. जे .पवार यांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज व लोकसहभागातून कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवाराचे केलेले सुशोभीकरण याबाबत देखील आमदार नितेश राणे यांनी आज मुंबईत महसूल मंत्र्यांचे या उपक्रमाबद्दल लक्ष वेधले. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्या मोबाईल वरून महसूल मंत्र्यांनी कणकवली तहसीलदारांशी थेट संवाद साधत “तुम्ही राबवलेला उपक्रम गौरवास्पद आहे. असेच चांगले काम करत राहा, काही अडचण असेल तर हक्काने मांडा असे आपुलकीचे शब्दही महसूल मंत्र्यांनी याप्रसंगी दिले. तहसीलदार आर. जे. पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तहसीलदार आर जे पवार यांनी केलेल्या कामाचे खऱ्या अर्थाने आज चीज झाले अशी भावना महसूल कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कणकवली तहसीलदारांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना आज राज्याच्या महसूल मंत्र्यांनी कणकवली तहसीलदारांनी उभारलेल्या ७५ फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाची व लोकसहभागातन कार्यालय परिसरात सशोभीकरण केल्याच्या कामाची दखल घेत गौरवउद्गार काढल्याने खऱ्या अर्थाने महसूल विभागाचा व लोकसहभाग दर्शवलेल्या सर्वांचा हा गौरव असल्याची भावना तहसीलदार आर. जे पवार यांनी व्यक्त केली.